विविध नाविण्यपूर्ण योजनांसह अनेक विकासकामांना प्राधान्यक्रम देत मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थीकेंद्रीत आणि सर्वसमावेशक असा २०१८-१९ सालचा ५७२.६० कोटीचा अर्थसंकल्प अधिसभेत मंजूर करण्यात आला. यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये विविध नाविण्यपूर्ण योजनांसह अनेक विकासकामांना प्राधान्य देण्यात आले आहे.
अर्थसंकल्पामध्ये ५१.१० कोटीची तूट दाखविण्यात आली आहे. तीन स्वतंत्र भागांमध्ये या वर्षीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून यामध्ये देखभाल आणि विकास, स्वतंत्र प्रकल्प आणि सहयोगी उपक्रमासाठी अनुदान अशा बाबींचा समावेश आहे.
त्याचबरोबर आर्थिक वर्ष २०१७-१८ साठी विद्यापीठाला एकूण १५ लाखांची देणगी प्राप्त झाली आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये विद्यापीठाने नाविण्यपूर्ण उपक्रम आणि योजना यासाठी भरघोस तरतूद केली आहे. यामध्ये विद्यार्थी भवन, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी वसाहत, परीसर विकास, विद्यापीठ सुरक्षा सक्षमीकरण, कॉम्पलेक्स संग्रहालय इमारत, १०० क्षमतेचे अतिथीगृह, ५०० क्षमतेचे मुलींचे वसतिगृह, शिक्षकांसाठी संशोधन प्रोत्साहन अनुदानाचा समावेश आहे.
त्याचसोबत केंद्रीय संशोधन सुविधा( इमारत आणि पायाभूत सुविधा) वाचनालयाचे अद्ययावतीकरण, अभिलेख हस्तलिखितांचे अद्ययावतीकरण, डेटा सेंटरचे अद्ययावतीकरण, शैक्षणिक पायाभूत सुविधा, आयसीटी पायाभूत सुविधा, कॅम्पसमध्ये कन्व्हेंशन सेंटर, शिक्षक आणि विद्यार्थी यांना सर्वोत्तम संशोधन पुरस्कार, सर्वोत्कृष्ठ शैक्षणिक विभाग पुरस्कार, प्लेसमेंट सेल, कौशल्य व उद्योजगता विकास केंद्र आणि रिसर्च पब्लीकेशन ग्रँट्स टू सायन्स आणि इतर विभाग अशा बाबींवर आधारीत विशेष अर्थसंकल्पीय तरतूदींसह विद्यापीठ सुधारणांवर भर देत विद्यार्थी केंद्रीत अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला.
याबरोबरच २०१८- २०१९ या वर्षामध्ये नियोजित बांधकामांना विशेष प्राधान्यक्रम देण्यात आला असून यामध्ये विद्यार्थी भवन, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी वसाहत, कॉम्प्लेक्स संग्रहालय इमारत १०० क्षमतेचे अतिथीगृह आणि ५०० क्षमतेचे मुलींचे वसतिगृह अशा नियोजित बांधकामाना प्राधान्य देण्यात आले आहे.
हेही वाचा-
मुंबई विद्यापीठात पूर्णवेळ कुलगुरू पाहिजे, एसएफआयची मागणी
युवासेनेला १००% मार्क्स, सिनेटच्या १० पैकी १० जागा जिंकल्या