मुंबई विद्यापीठ परीक्षेची कागदपत्रं आता इ-मेलवर स्वीकारणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षा विभागात प्रत्यक्ष न येता निकाल कक्षाच्या ५ विद्याशाखेच्या ई-मेलवर संपर्क साधावा, असं आवाहन परीक्षा विभागाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी केले आहे.
परीक्षा विभागातील निकाल कक्ष परीक्षेशी संबंधित बाबी पाहते. यात विद्यार्थ्यांचे प्रवेश अस्थायी असणे, यापूर्वीची परीक्षा उत्तीर्ण नसणे, परीक्षेत उपस्थित नसणे, तसेच निकालात काही दुरुस्ती असणे अशा विविध कारणासाठी निकाल राखीव ठेवला जातो. याची दुरुस्ती करण्यासाठी संबंधित महाविद्यालय त्या विद्यार्थ्यांची बाब दुरुस्तीसाठी किंवा निकाल जाहीर करण्यासाठी त्याची कागदपत्रे जोडून विद्यापीठाकडे पाठवते किंवा ती कागदपत्रे घेऊन विद्यार्थी परीक्षा विभागाच्या निकाल कक्षात प्रत्यक्ष येत असतो. पण सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थी प्रवास करून अनेकदा परीक्षा भवनात येणे हे त्याच्या आरोग्याच्या दृष्टीने आणि तेथे कार्यरत अधिकाऱ्यांच्या दृष्टीने हितावह नाही. यामुळे संसर्ग पसरण्याची भीती अधिक आहे.
निकाल कक्षाचे उपकुलसचिव नरेंद्र खलाणे यांनी निकाल कक्षाचे पाच ई-मेल तयार करून विद्यार्थ्यांसाठी सुविधा निर्माण केली. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा विभागात न येता ती कागदपत्रे स्कॅन करून संबंधित विद्याशाखेच्या खालील ५ ई-मेल वर पाठवावीत, असे आवाहन विद्यापीठाने केले आहे.
विद्याशाखा व त्यांचे ईमेल
१. कला शाखा निकाल कक्ष : artsresult34a@gmail.com
२. विज्ञान शाखा निकाल कक्ष : scienceresult34b@gmail.com
३. वाणिज्य शाखा निकाल कक्ष : commerceresult36@gmail.com
४. विधी शाखा निकाल कक्ष : lawresult29a@gmail.com
५. अभियांत्रिकी शाखा निकाल कक्ष : enggresult36a@gmail.com
हेही वाचा -