शाळेत विद्यार्थ्यांना होणारी मारहाण, विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आता शाळेत तक्रार पेट्या बसवण्यात येणार आहेत. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये तक्रार पेट्या बसवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. अनेकवेळा विद्यार्थी आपल्यावर होणारा अन्याय सांगत नाहीत. त्यामुळे शालेय विभागाने एक परिपत्रक काढले असुन त्यात तक्रार पेट्या बसवण्याचे निर्देश शाळांना दिले आहेत.
मुलांना दिसेल अशा ठिकाणी ही तक्रार पेटी लावणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे पेटी मोठी आणि सुरक्षित असेल याची काळजी घेण्यात यावी, तक्रारपेटी आठवड्याच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी उघडण्यात यावी, आणि यावेळी मुख्याध्यापक, पोलिसांचा प्रतिनिधी, पालकांचा प्रतिनिधी असणे आवश्यक आहे. तसेच शाळांना तक्रार पेटीत आलेल्या तक्रारींचे तातडीने निवारण करणेही गरजेचे आहे. त्याचप्रमाणे तक्रारदाराचे नाव गुप्त राहील, आणि तक्रारदाराला कोणताही त्रास होणार नाही, याची खबरदारी शाळेने घेणे आवश्यक आहे, असं या परिपत्रकात म्हटलं आहे.