Advertisement

मनोहर कोतवाल शाळेची मुजोरी अजून वाढली


मनोहर कोतवाल शाळेची मुजोरी अजून वाढली
SHARES

विक्रोळी - शाळेची फी भरा...नाही तर जमिनीवर बसा...असा तुघलकी फतवा काढणाऱ्या मनोहर कोतवाल शाळा प्रशासनाची मुजोरी आता आणखी वाढलीये. बुधवारी शाळेचा क्रीडा महोत्सव असताना फी न भरणाऱ्या विद्यार्थ्यांचा महोत्सवात समावेश न करता त्यांना चक्क एका खोलीत डांबून ठेवलं गेलं. या सर्व प्रकारामुळे संतापलेल्या पालकांनी शाळा प्रशासनालाच धारेवर धरलं. पालकांनी थेट स्थानिक पोलीस ठाण्यात धाव घेतली. यानंतर पालक-प्रशासनातील वाद चांगलाच पेटला. विशेष म्हणजे पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करण्याएेवजी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला.

शाळेच्या मुजोरीचा पर्दाफाश 'मुंबई लाईव्ह'ने मंगळवारी केला होता. मुंबई लाईव्हच्या वृत्तानंतर चिडलेल्या शाळा प्रशासनाची मुजोरी आणखी वाढली आणि मुलांना वर्गात डांबण्यापर्यंत प्रशासनाची मजल गेली. मुंबई लाईव्हने थेट प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग नंद कुमार यांच्याशी संपर्क साधत शाळेच्या मुजोरीबाबत तक्रार केली. त्यानंतर मात्र चक्र फिरले आणि त्वरित डांबलेल्या मुलांना शाळेबाहेर काढण्यात आले. तर शिक्षण निरीक्षकही पोलीस ठाण्यात पोहचले.

दरम्यान, शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न 'मुंबई लाईव्ह'ने केला. पण प्रचारात व्यस्त असलेल्या शिक्षण मंत्र्यांशी संपर्क काही होऊ शकला नाही. पोलिसांनी गुन्हा नोंदवण्याएेवजी मध्यस्थी करत शिक्षण निरिक्षकांनाच शाळा आणि पालकांची बैठक घेण्याची विनंती केली. त्यामुळे आता पालक आणि विद्यार्थांचे लक्ष या बैठकीकडे लागलंय. पण शाळेची मुजोरी अशीच सुरू राहिली तर ही मुजोरी खपवून घेणार नाही, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू देणार नाही असा चंगच आता पालकांनी बांधलाय.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा