अकरावी बायफोकल (द्विलक्षी) अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन अर्ज दाखल केलेल्या ९ हजार ५०६ विद्यार्थ्यांपैकी ५ हजार ०५७ विद्यार्थी दुसऱ्या फेरीतील प्रवेशास पात्र ठरले आहेत. यामध्ये दुसऱ्या पसंतीचे महाविद्यालय मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ९६५ इतकी आहे.
अकरावी प्रवेशात बायफोकल विषयाच्या अभ्यासक्रमासाठी मुंबई विभागातल्या महाविद्यालयातील २६ हजार ९०४ जागांसाठी फक्त १४ हजार ३३८ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केलं होतं. या विद्यार्थ्यांची दुसरी यादी गुरूवारी २८ जूनला जाहीर करण्यात आली. यामध्ये शाखानिहाय बायफोकल विद्यार्थ्यांपैकी कला शाखेतील विषयांसाठी २ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केला. या सर्वांना पसंतीचं महाविद्यालय मिळालं आहे. विज्ञान शाखेतील ९ हजार २२० विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले असून या यादीत ४ हजार ८९९ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले. याशिवाय वाणिज्य शाखेतील २८४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले. त्यातील १५६ जणांना प्रवेश देण्यात आले.
बायफोकल प्रवेशप्रक्रियेतील दुसऱ्या यादीत ५ हजार ०५७ विद्यार्थ्यांचा समावेश असून कला शाखेतील ०२, वाणिज्य शाखेतील १५६ आणि विज्ञान शाखेतील ४ हजार ८९९ विद्यार्थी यासाठी पात्र ठरले आहे. तसंच ज्या विद्यर्थ्यांचं नाव दुसऱ्या फेरीत आलं आहे ते सर्व विद्यार्थी तिसऱ्या फेरीसाठी पात्र ठरणार नाहीत. पहिल्या फेरीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना शुक्रवारी २९ जून आणि शनिवार ३० जूनपर्यंत महाविद्यालयात आपला प्रवेश निश्चित करायचा आहे.
महाविद्यालयाचे नाव | बायफोकल विषय | टक्केवारी |
---|---|---|
के. सी. महाविद्यालय, चर्चगेट | कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स मेन्टेनन्स, ऑफिस मॅनेजमेंट | ९०.४०, ८७.००, ८८.६०, ७१.०० |
जयहिंद महाविद्यालय | कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स | ९१.८३, ८८.८० |
रूईया महाविद्यालय | कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स | ९४.८०, ९७.८० |
मिठीबाई महाविद्यालय | कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स | ९२.६०, ८९.२० |
गेल्या आठवड्यात गुरूवारी २१ जूनला अकरावी बायफोकल (द्विलक्षी) अभ्यासक्रमासाठी पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. त्यात १४ हजार ३३८ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्जांपैकी ७ हजार ४०६ विद्यार्थी पहिल्या फेरीतील प्रवेशास पात्र ठरले होते.
हेही वाचा -