ठाकूर पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी 'टेकगिग कोड ग्लॅडिएटर्स २०१८' या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला अाहे. त्यांना दीड लाख रूपयांचे पारितोषिक मिळाले अाहे. खेम अग्रवाल, प्रणय लोबो आणि आदित्य खेडेकर या विद्यार्थ्यांच्या टीमने या स्पर्धेतील टेकगिग (TechGig) हॅकथॉन या शेवटच्या टप्प्यात उल्लेखनीय कामगिरी केली.
'टेकगिग कोड ग्लॅडिएटर्स' या स्पर्धेत तीन फेऱ्या असून त्यातील पहिली फेरी ही अॅप्टिट्यूड टेस्टची असते. या फेरीत विद्यार्थ्यांचं टेक्नोलॉजीतील कोडींग ज्ञान तपासण्यासाठी एमसीक्यूचा समावेश करण्यात येतो. त्यानंतर दुसऱ्या फेरीतील ऑनलाईन हॅकथॉन ज्यात विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रकल्पावर विचार सादर करावे लागतात.
अंतिम फेरीसाठी स्पर्धकांना २४ तासांच्या आत एक प्रकल्प तयार करावा लागतो. यंदा या स्पर्धेत ८००० जणांनी सहभाग घेतला होता. दुसऱ्या फेरीसाठी आयोजकांनी २५ संघांची निवड केली. त्यातील १५ संघांनी अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीसाठी निवडलेल्या १५ संघाला २४ तासाच्या आत हिअर (HERE) एसडीकेचा वापर करुन अँड्रॉइड अॅप तयार करुन परीक्षकांना दाखवणं आवश्यक होतं.
ठाकूर पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी 'ऑटोमॅटिक टेल-लाईट नेव्हिगेशन युजिंग हिअर मॅप्स' असं नाव देऊन अँड्रॉइड अॅप तयार केले. त्यांनी रस्त्यांवरील अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी आणि लांबच्या प्रवासदरम्यान चालकाचा भार कमी करण्यासाठी कारचे टेल-लाईट्सला हिअर मॅपसोबत जोडलं. हे अॅप केवळ व्हेईकल नेव्हिगेशन प्रणालीमध्येच नव्हे तर सेमी ऑटोमेशन क्षेत्रातदेखील वापरला जाऊ शकते. असं या विद्यार्थ्यांनी म्हटलं अाहे.
हेही वाचा -
बायफोकल प्रवेशाची पहिली यादी जाहीर
एफवाय प्रवेशाच्या दुसऱ्या मेरीट यादीला स्थगिती