राज्य मंडळाच्या १०वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा शुक्रवारपासून सुरू होत आहे. परीक्षार्थीची संख्या यंदा घटली आहे. दरवर्षी फेरपरीक्षा जुलैमध्ये घेण्यात येते, तर सप्टेंबरमध्ये निकाल जाहीर होतात. या विद्यार्थ्यांना त्याच शैक्षणिक वर्षांत पुढील वर्गात प्रवेशही मिळतो. परंतु यंदा कोरोनामुळं विद्यार्थ्यांच्या परीक्षांना उशीर झाला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या आणि श्रेणी सुधारण्यासाठी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची शुक्रवारपासून फेरपरीक्षा सुरू होत आहे. या फेरपरीक्षेला दहावीच्या ४२ हजार ६३४ विद्यार्थ्यांनी, तर बारावीच्या ६७ हजार ६०३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. राज्यातील ६७२ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे.
दरवर्षीच्या तुलनेत यंदा या परीक्षेची विद्यार्थिसंख्या घटली आहे. साधारण एक ते सव्वा लाख विद्यार्थी फेरपरीक्षा देतात. दहावी आणि बारावीच्या दोन्ही इयत्तांचे मार्चमधील परीक्षेचे वाढलेले निकाल, लांबलेली परीक्षा आणि शैक्षणिक वर्ष, करोनाची धास्ती यामुळे परीक्षार्थीची संख्या काही प्रमाणात घटल्याची माहिती मिळते.