गुणवत्तेच्या आधारावर शिक्षक भरती व्हावी, यासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सामान्य प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय पद्धतीने सीईटीच्या माध्यमातून शिक्षक भरती करणे हा ऐतिहासिक निर्णय ठरला आहे. मात्र यापुढे सीईटीला बसण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच (टीईटी) पास असणे आवश्यक असेल. महाराष्ट्रातील अनुदानित शाळांमधील शिक्षण भरती आता केंद्रीय अभियोग्यता चाचणीद्वारे घेण्यात येणार आहे. त्यामुळे आता शाळांमधील भरती प्रकरणात होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसेल. केवळ गुणवत्तेच्या आधारावर ही भरती करण्यात येणार आहे. खासगी आणि अनुदानित शाळांमध्ये वाढत जाणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालावा, अशी मागणी विविध संघटनांनी महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली होती.
यावर्षी शिक्षक पात्रता परीक्षा जुलै महिन्यातील शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. हा प्रस्ताव परीक्षा परिषदेने शालेय शिक्षण विभागाकडे पाठवला आहे. शिक्षक होण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवाराला आधी पहिली ते आठवीच्या अभ्यासक्रमावर आधारीत शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षा द्यावी लागेल.