शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासोबतचं वादविवाद प्रकरण शांत होत नाही, तोच बाॅलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने आता गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत पंगा घेतला आहे. माझी ड्रग्ज टेस्ट घ्याच. ड्रग्ज टेस्टमध्ये पाॅझिटिव्ह सापडले तर चूक कबुल करून मुंबई कायमची सोडेन, असं आव्हान कंगनाने गृहमंत्र्यांना दिलं आहे. (actress kangana ranaut demands drug test to maharashtra home minister anil deshmukh)
सुशांत सिंह राजपूत प्रकरणात बाॅलिवूड आणि ड्रग्ज माफियांचं कनेक्शन असल्याचा दावा करणाऱ्या कंगनाने केवळ सोशल मीडियावर व्यक्त न होता, आपल्याकडील माहिती तपास यंत्रणांना द्यावी, असं संजय राऊत म्हणाले होते. तेव्हापासून या दोघांमध्ये चांगलीच जुंपली होती.
त्यानंतर मुंबईची पाकव्याप्त काश्मीरसोबत तुलना करणाऱ्या कंगनाविरोधात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी सोमवारी ७ सप्टेंबरला विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केली. त्यावर पुढील २४ तासांत याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांनी राज्याच्या गृहमंत्र्यांना दिले होते.
हेही वाचा - कंगना गोत्यात? विधानसभा अध्यक्षांनी दिले २४ तासांत अहवाल सादर करण्याचे गृहमंत्र्यांना आदेश
I am more than happy to oblige @MumbaiPolice @AnilDeshmukhNCP please do my drug tests investigate my call records if you find any links to drug peddlers ever I will accept my mistake and leave Mumbai forever, looking forward to meet you 🙂 https://t.co/gs3DwcIOvP
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 8, 2020
त्यावर विधानसभेत उत्तर देताना, कंगना रणौत आणि अध्ययन सुमन यांच्यात संबंध होते. अध्ययन सुमनने एका मुलाखतीत कंगना ड्रग्ज घेत असून तिने ड्रग्ज घेण्यासाठी आपल्यावरही जबरदस्ती केल्याचं सांगितलं होतं. मुंबई पोलीस याप्रकरणी अधिक माहिती घेत आहेत, असं गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.
त्यानंतर मुंबई पोलीस आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माझी ड्रग्ज टेस्ट घ्यावीच. तसंच माझे काॅल रेकाॅर्ड देखील तपासावेत. कुठल्याही ड्रग पेडलर्ससोबत माझी लिंक आढळून आली, तर मी माझी चूक कबूल करेन आणि मुंबई कायमची सोडून जाईन, असं आव्हान कंगनाने दिलं आहे.
आता ९ सप्टेंबर रोजी मुंबईत येण्याचा दावा करणाऱ्या कंगना रणौतविरोधात मुंबई पोलीस काय पावलं उचलताहेत, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा - “मुंबईचा अपमान करणाऱ्या कंगनाला ‘वाय’ दर्जाची सुरक्षा देणं धक्कादायक”