‘फिक्सर’ या शोचं शुटिंग मीरा रोड या ठिकाणी सुरू असताना अज्ञात हल्लेखोरांनी अभिनेत्री माही गिल आणि इतर कलाकारांना मारहाण केल्याची घटना मिरा रोडमध्ये घडली. या घटनेप्रकरणी अभिनेत्री माही गिल आणि तिच्या इतर क्रू मेंबर्सनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. 'जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करा', अशी मागणी माही गिल आणि तिच्या क्रू मेंबर्सनी मुख्यमंत्र्यांकडं केली आहे.
‘फिक्सर’ या शोचं शुटिंगदरम्यान माही गिल आणि इतर सदस्यांना बुधवारी ४.३० वाजताच्या सुमारास एका टोळक्यानं दारू पिऊन मारहाण केली. मारहाण केल्यामुळं निर्माता साकेत सावनी यांनाही दुखापत झाली. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी या टोळक्याची साथ दिल्याचा आरोप माही गिलनं केला आहे. याबाबत दिग्दर्शक तिग्मांशू धुलिया यांनी एक व्हिडिओ ट्विट करत यासंदर्भातली माहिती दिली होती. त्यानंतर पोलिसांनी ७ जणांना ताब्यात घेतलं असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
'या शुटिंगसाठी आम्हाला का विचारलं नाही असं म्हणत आम्हाला आणि सेटवरच्या इतरांनाही लाठ्याकाठ्यांनी आणि रॉडनं मारहाण करण्यास सुरूवात केली’, ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये साकेत सावनी यांनी म्हटलं. त्याशिवाय, 'एवढंच नाही तर माही गिल यांनाही मारलं. आमचं काहीही ऐकून घ्यायला ते तयार नव्हते. आमच्या दिग्दर्शकाला, डीओपीला, कलाकारांना सगळ्यांना या चौघांनी मारहाण केली. एखाद्या जनावराला मारतात त्याप्रमाणं इथं मारहाण करण्यात आली, असा प्रकार मी पहिल्यांदा पाहिला', असं माही गिलनं म्हटलं.
'घडलेला हा हा सगळा प्रकार आम्ही पोलिसांकडं घेऊन जात नाही, कारण पोलीस स्वतःच सांगत होते की यांना मारा' असाही आरोपही माही गिलनं केला आहे. त्याचप्रमाणं, जिमी जीपच्या लोकांना देखील पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
'पोलीस जेव्हा आले तेव्हा त्यांनी कंपाऊंडचं दार लावून घेतलं आमचं सामान जप्त केलं. तुम्ही आम्हाला पैसे देणार नाही तोपर्यंत तुमचं सामान मिळणार नाही असं आम्हाला पोलिसांनी धमकावलं. तसंच तुम्हाला तुमचं सामान हवं असेल तर कोर्टात जा' असं साकेत सावनी यांनी म्हटलं.
हेही वाचा -
गिरणी कामगारांना बेलापूर, उरणमध्ये घरं द्यावी, राधाकृष्ण विखे-पाटील अजब सल्ला
वडाळामध्ये सुनेकडून सासूची हत्या