Advertisement

लीला करणार अमृताची इमेज ब्रेक


लीला करणार अमृताची इमेज ब्रेक
SHARES

अमृता सुभाषला आपण बऱ्याचदा साध्या-सोज्ज्वळ भूमिकांमध्ये पाहिलं आहे. पण प्रदर्शनाच्या वाटेवर असणाऱ्या ‘झिपऱ्या’ या मराठी सिनेमात अमृताचं एक वेगळंच रूप पाहायला मिळणार आहे.
कवी मनाची आणि गोड गळ्याची प्रतिभावान अभिनेत्री अशी ओळख असलेल्या अमृता सुभाषला आजवर विविध नाटकं, मराठी-हिंदी सिनेमे आणि टिव्ही शोजमधून वेगवेगळ्या रूपात पाहिलं आहे. या सर्व भूमिका एकमेकांपेक्षा भिन्न असल्या तरी साधेपणा हा एक समान धागा यांना एकत्र आणणारा आहे. पण ‘झिपऱ्या’ या आगामी सिनेमात साकारलेली लीला आपली इमेज ब्रेक करणारी असल्याचं अमृताने ‘मुंबई लाइव्ह’शी बोलताना सांगितलं.


आवडती कादंबरी

अरुण साधू माझे खूप आवडते लेखक आहेत. त्यातही झिपऱ्या ही कादंबरी खूप आवडीची असल्याने या सिनेमाचा एक भाग होणं ही माझ्यासाठी खूप आनंददायी गोष्ट आहे. त्यामुळे या सिनेमासाठी जेव्हा मला विचारण्यात आलं, तेव्हा नकार देण्यासारखं काहीच नव्हतं. केदार वैद्यसारखा दिग्दर्शक असल्याने एका आवडीच्या कादंबरीवरील सिनेमात काम करण्याचं समाधान लाभलं.



इमेज ब्रेक करणार

आजवर नेहमीच मी साध्या भूमिका साकारल्या असल्याने जनमानसात माझी एक विशिष्ट इमेज तयार झाली आहे. पण ‘झिपऱ्या’मध्ये साकारलेली लीला या इमेजला छेद देत माझं नवं रूप समोर आणणारी आहे. झिपऱ्या कादंबरीमधील लीला ही एकमेव अशी स्त्री व्यक्तीरेखा आहे, जी झिपऱ्याच्या आयुष्याला कलाटणी देते. लीला हे कॅरेक्टर कोणत्याही एका स्लॅाटमध्ये न बसणारं आहे. लीला ही झिपऱ्याची बहिण असल्याने तिला काहीही बोललेलं त्याला खपत नाही. त्यामुळे त्याच्यात आमूलाग्र बदल घडत जातो.

Advertisement



श्रेय अश्विनी दरेकरांना

अमृता सुभाष म्हणजे सोज्वळ भूमिका हे समीकरण निर्मात्या अश्विनी दरेकर यांनी मोडलं आहे. कारण अरुण साधूंसारख्या लेखकाने लिहिलेल्या कादंबरीतील एक भन्नाट स्त्री व्यक्तिरेखा आणि त्या व्यक्तिरेखेत मला पाहून संधी देणं हे अश्विनीचं कसब आहे. अर्थातच केदारची या सर्वांना साथ लाभल्यानेच लीला साकारणं शक्य झालं. प्रत्येक अभिनेत्रीला वेगवेगळ्या भूमिका करायच्या असतातच त्या अर्थाने ही भूमिका खूप महत्त्वाची वाटते.


लीला अशी का?

लीला ही झोपडपट्टीत राहणारी असल्याने सोज्वळ नसली तरी भोळसटही नाही. चालूही नाही. तिने तिचा निरागसपणाही जपलेला आहे. त्यामुळे प्रत्येक प्रसंगात ती कशी वागेल याचा विचार करणं खूप इंटरेस्टिंग होतं. ती ठोकळेबाज नाही. कारण शेवटी तिला जगायचं आहे. चांगलं आयुष्य जगण्याची जिद्द लीलाकडे आहे. त्यामुळेच झिपऱ्या चांगल्या मार्गाला लागावा यासाठी तिची धडपड सुरू असते.

Advertisement



भर गर्दीत इंटिमेट सीन

रिअल लोकेशन्सवर प्रचंड गर्दीत या सिनेमाचं चित्रीकरण करण्यात आलं आहे. या सिनेमातील माझ्या एंट्रीच्या सीनमध्ये सिनेमातील उस्ताद माझ्यावर लाईन मारत असतो. तो इंटिमेट सीन भर गर्दीत शूट करण्यात आला आहे. अशा प्रकारचा सीन शूट करताना लागणारी एकाग्रता मिळण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावावी लागते. सर्वांकडे दुर्लक्ष करत भर गर्दीत एक इंटिमेट सीन करण्याचा अनुभव वेगळाच होता.



हेही वाचा -

त्रास देणाऱ्याचा रणवीर घेणार क्लास

अमृताने दिवसभरात ओढल्या ४० सिगरेट्स!



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा