अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या भलताच फॅार्ममध्ये आहे. काही दिवसांपूर्वी आपल्या बायोग्राफीमुळे काहीसा वादाच्या भोवऱ्यात अडकलेला नवाजुद्दीन सध्या चित्रीकरणात खूपच व्यग्र आहे. आता तो सुनील शेट्टीची मुलगी आथियासोबत ‘मोतीचूर’ खाणार असल्याची बातमी आली आहे.
सलमान खानच्या होम प्रॅाडक्शनमध्ये तयार झालेल्या ‘हिरो’ चित्रपटाद्वारे बॅालीवूडमध्ये दाखल झालेली आथिया आता ‘मोतीचूर चकनाचूर’ असं काहीसं वेगळं शीर्षक असलेल्या चित्रपटात नवाजुद्दीनसोबत दिसणार आहे. दोघांनी नुकतंच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला प्रारंभ केला आहे. नवाजुद्दीनने आजवर नेहमीच वेगळ्या धाटणीच्या भूमिकांना प्राधान्य दिलं आहे. प्रेक्षकांनीही त्यांचे चित्रपट डोक्यावर घेतले असल्याने ‘मोतीचूर चकनाचूर’मध्ये असं काय विशेष आहे याची उत्सुकता लागली आहे.
कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात नवाजुद्दीनसारख्या मातब्बर अभिनेत्यासोबत काम करण्याची संधी मिळणं ही आथियासाठी खूप मोठी बाब असल्याचं मानलं जात आहे. हे दोघे जरी या चित्रपटात एकत्र असले तरी यांची जोडी असेल का? याबाबतचा खुलासा अद्याप करण्यात आलेला नसल्याने ‘मोतीचूर चकनाचूर’बाबतचं कुतूहल अधिक वाढणार आहे. देबामित्रा हसन या चित्रपटाचं दिग्दर्शन करीत असून, निर्मितीची धुरा राजेश आणि किरण भाटीया यांनी सांभाळली आहे.
हा चित्रपट म्हणजे वेडींग कॅामेडी असल्याचं सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून समजतं. या चित्रपटात आथिया उत्तर भारतातील छोट्याशा शहरातील मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. नवाजुद्दीन या चित्रपटाचा नायक असून, यात सिच्युएशनल कॅामेडीवर भर देण्यात येत आहे. भोपाळमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू असून तिथेच चित्रपटातील महत्त्वाचं शूट करण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप ठरवण्यात आलेली नसल्याची माहितीही मिळाली आहे.
हेही वाचा -
EXCLUSIVE : मृणालच्या विराजसने ‘सव्वीशी’त गाठली ‘पासष्ठी’!