मुंबई - जुन्या काळात गाजलेली नाटकं पुन्हा रंगभूमीवर आणण्याचा ट्रेंड हल्ली एकीकडे लोकप्रिय होत असतानाच दुसरीकडे नाटकांचं चित्रपटरूप करण्याचं प्रमाणही खूप वाढलं आहे.
प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी काही महिन्यांपूर्वीच 'सेलिब्रेशन' हे नाटक 'फॅमिली कट्टा' या चित्रपटरूपात मोठ्या पडद्यावर आणलं होतं. आता 'ध्यानीमनी' हे नाटक चार भिंतींची मर्यादा ओलांडून रुपेरी पडद्यावर अवतरलं आहे. प्रशांत दळवी यांनी सुमारे दोन दशकांपूर्वी लिहिलेल्या या नाटकात थोडे फार जुजबी बदल केले आहेत. बाकी चंद्रकांत कुलकर्णींनी कथानकाचा ढाचा तोच ठेवला आहे.
मानवी मनाचा तळ गाठणं हे महाकठीण काम. लेखक-दिग्दर्शकानं या कलाकृतीमधून अशाच काही मनांचा तळ गाठण्याचा प्रयत्न केलाय. तो नक्कीच कौतुकास्पद म्हणावा लागेल. चित्रपटाचा पूर्वार्ध खूप छोटा असला तरी (मुळात संपूर्ण चित्रपटच अवघ्या 102 मिनिटांचा आहे) तरी तो रेंगाळल्यासारखा वाटतो. चित्रपट वेग घेतो ते उत्तरार्धात. काही अनाकलीय गोष्टींची उकल इथं होताना दिसते. महेश मांजरेकर यांच्यामध्ये दडलेल्या ताकदीच्या अभिनेत्याने हा चित्रपट एका विशिष्ट उंचीवर नेवून ठेवलाय. मात्र एवढ्या चांगल्या गोष्टी असूनही संपूर्ण चित्रपट नाटकाच्या चौकटीमधून फार बाहेर पडलाय असं वाटत नाही. या नाटकाचा चित्रपट बनवण्यासाठी काही प्रसंगांना मुद्दाम आऊटडोअरमध्ये नेल्याचं अगदी सहज कळतं. तरीदेखील एक वेगळा, लक्षात राहणारा अनुभव म्हणून हा चित्रपट पहायला हवा.
सदानंद पाठक (महेश मांजरेकर) आणि शालिनी पाठक (अश्विनी भावे) यांची ही गोष्ट आहे. सदानंद हा मोठ्या कष्टानं नोकरीतल्या एक एक पायऱ्या वर चढत असतो, तर दुसरीकडे मातृत्वाच्या अतीव इच्छेमधून शालिनीनं मोहितला जन्म दिलेला असतो. मोहित हेच तिचं विश्व असतं आणि सदानंदही या विश्वाच्या पलीकडं कधी जाऊ नये, यासाठी ती कसोशीनं प्रयत्न करते. एका क्षणासाठीही मोहितला ती दूर जाऊ देत नसते. हे विलक्षण तिहेरी नातं संकटात सापडतं ते समीर करंदीकर (अभिजीत खांडकेकर) आणि अपर्णा करंदीकर (मृण्मयी देशपांडे) यांच्या आगमनामुळे. समीरच्या वडिलांचे आणि पाठक कुटुंबियांचे जवळचे संबंध. अपर्णाला नुकतीच अनपेक्षितरीत्या मातृत्वाची चाहूल लागलेली असते. मातृत्वाच्या नंतरच्या दिव्यातून पार पडण्याआधी थोडी फार मजा करावी म्हणून अपर्णा आणि समीर सदानंद-शालिनीच्या घरी येतात. इथं आल्यानंतर मात्र समीर आणि अपर्णाला वेगळ्याच अनुभवाला सामोरं जावं लागतं. हा अनुभव त्यांच्या आयुष्यालाच कलाटणी देतो.
अपत्य नसलेल्या शालिनीला केंद्रस्थानी ठेवून लेखक प्रशांत दळवींनी मानवी मनाच्या तळात शिरण्याचा प्रयत्न केला आहे. तो बहुतांशी यशस्वी झाला आहे. मात्र दोन दशकांपूर्वीचं नाटक पुन्हा पडद्यावर आणताना काही गोष्टी राहून गेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे गेल्या 20 वर्षांमध्ये प्रसूतीशास्त्रात झालेले नवीन बदल. हे ध्यानात घेऊन कथानकात थोडे बदल करणं आवश्यक होतं. ते झालेले दिसत नाहीत. तसेच नाटक कितीही चांगलं असलं तरी त्याला चित्रपटात परावर्तित करताना चित्रपट माध्यमाच्या बलस्थानांचा वापर करणं आवश्यक असतं. या चित्रपटात तसा तो झालेला दिसत नाही. हा चित्रपट आहे म्हणून काही प्रसंग आऊटडोअरला शूट केलेत की काय, असंही वाटून जातं. तरीदेखील मूळ विषय चांगला असल्यामुळे या त्रुटी तेवढ्या त्रास देत नाहीत. तसेच या संपूर्ण चित्रपटावर एक विशिष्ट गूढ छाया पसरलेली आहे. मात्र चित्रपटाच्या सुरुवातीपासूनच पार्श्वसंगीतामधून ही गूढ छाया दाखविण्याची घाई करण्याची गरज नव्हती. लेखक-दिग्दर्शकाच्या प्रयत्नांना सर्वात मोठी साथ दिली आहे ती कलावंतांनी. महेश मांजरेकरांनी सदानंद पाठकची व्यक्तिरेखा अत्यंत सहजतेनं साकारलीय. सदानंदच्या व्यक्तिरेखेतले सर्व कंगोरे मांजरेकर यांनी लीलया साकारले आहेत. अभिजीत खांडकेकर आणि मृण्मयी देशपांडे यांनीही आपापल्या व्यक्तिरेखा चोख निभावल्या आहेत. थोडीफार गडबड झालीय ती अश्विनी भावे यांच्याकडून. खरं तर त्या चांगल्या अभिनयासाठी प्रसिद्ध आहेत. मात्र पूर्वार्धात त्यांच्या अभिनयावर मर्यादा आल्याचे जाणवते. कदाचित व्यक्तिरेखेच्या वाट्याला आलेले अति संवाद हे देखील त्यामागचं कारण असावं. उत्तरार्धात त्यांनी आपल्या व्यक्तिरेखेचा टोन बरोबर पकडलाय. चित्रपटाच्या इतर तांत्रिक गोष्टी ठीकठाक आहेत.