किशोरी अमोणकर हिंदुस्थानी शास्त्रीय परंपरेतील एक दिग्गज आणि जयपूर घराण्याच्या अग्रणी गायिका. सोमवारी रात्री त्यांचं निधन झालं आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत खराब होती आणि शेवटी सोमवारी रात्री त्यांनीअखेरचा श्वास घेतला.
गायिका मोगुबाई कुर्डीकर या किशोरीताईंच्या मातोश्री. त्यामुळे गाणे वारसाहक्काने त्यांच्याकडे आले होतेच. मात्र केवळ वारसाहक्कावर समाधान न मानता विलक्षण गुणग्राहक वृत्तीने किशोराताईंनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील जे जे मोलाचे ते ते वेचले आणि आपले गाणे समृद्ध केले.
किशोरीताईंवर ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांनी ‘भिन्न षडज’ या नावाने एक लघुपट तयार केला होता. किशोरीताईंच्या आयुष्यातील चढउतार, त्यांचा एकेकाळी गेलेला आवाज, त्यानंतर आयुर्वेदिक औषधांची लागू पडलेली मात्रा, त्यातून मिळालेली नवी दृष्टी आदींचा अंतर्भाव या लघुपटात करण्यात आला आहे.
आतापर्यंत किशोरीताईंना बऱ्याच पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे ज्यात संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९८५) , पद्मभूषण पुरस्कार(१९८७) ,संगीत सम्राज्ञी पुरस्कार (१९९७) , पद्मविभूषण पुरस्कार (२००२), संगीत संशोधन अकादमी पुरस्कार (२००२) ,संगीत नाटक अकादमी फेलोशिप (२००९) ह्यांचा समावेश आहे तसेच किशोरीताई यांना त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल ‘पद्मभूषण’ १९८७ व २००२ मध्ये ‘पद्यविभूषण’ या पुरस्कारांनी ही गौरवण्यात आले होते. कला क्षेत्रातील मानाचा ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’ही त्यांना मिळाला होता.
किशोरीताईंच्या जाण्याने कधीही न भरून निघणारी पोकळीनिर्माण झाली आहे. शरीराने जरी आपल्यात नसल्या ती त्यांच्या संगीताने , गाण्याने त्या सदैव सगळ्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण करून राहतील.