मुंबई - हाजी मस्तान, दाऊद, वरदराजन यांच्या आयुष्यावर अनेक चित्रपट येऊन गेले आहेत. अशा धाटणीच्या चित्रपटांना सिनेरसिकांचा नेहमीच चांगला प्रतिसाद मिळालाय. असाच एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणाराय. 'राजन' हा सिनेमा लवकरच मराठी सिल्वर स्क्रीनवर झळकणार आहे. ऱ्हिदम मुव्ही प्रेजेंट्ससोबत मुदिता फिल्म आणि अनुसया एंटरप्रायजेस हा चित्रपट प्रस्तुत करत आहेत.
भरत सुनंदा दिग्दर्शित आणि लिखित हा सिनेमा अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनवर आधारित आहे. मराठी चित्रपटात यापूर्वी कधीच न झालेला असा थरार 'राजन' या चित्रपटामार्फत चित्रपट रसिकांना अनुभवायला मिळेल. चित्रपटात छोटा राजनची भूमिका कोण साकारणार हे मात्र अजून गुपित आहे. राहुल गौतम सतदिवे, दर्शना सागर भांडगे, दीप्ती श्रीपत यांनी या चित्रपटाची निर्मिती केलीय. तर कल्याण शिवाजी कदम, धनुष खंडारे, हेमंत वामन पाटील सहनिर्मिते आहेत.