अलिकडच्या काळात केवळ क्रिकेटमध्येच नव्हे, तर इतर खेळांमध्येही आपल्या देशातील खेळाडू अव्वल स्थानी पोहोचले आहेत. तरीही असे असंख्य खेळाडू आहेत जे निष्क्रिय निवडप्रक्रियेचे बळी ठरले आहेत. त्यांच्या कलागुणांना वाव द्यायलाच काय, पण त्यांच्याकडे पाहायलाही कुणाला वेळ नाही. खेड्यापाड्यात अशा मुलांची संख्या खूप आहे. केवळ त्यांना योग्य मार्गदर्शन, संधी आणि प्रोत्साहन दिलं तर ते देखील शिखरावर पोहोचू शकतात हे दिग्दर्शक मिलिंद शिंदे यांनी या सिनेमात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
चांगल्या खेळाडूंना संधी मिळत नाही, खेळातही राजकारण केलं जातं, निवडसमिती भ्रष्ट असते, खेळाडूंना अचूक मार्गदर्शन मिळत नाही या आणि यांसारख्या बऱ्याच गोष्टींची चर्चा आपल्या आजूबाजूला नेहमीच सुरू असते. हे सर्व ठीक झालं किंवा यावर मात केली तर एखाद्या दुर्गम भागातील अशिक्षीत मुलगाही देश पातळीवर नावलौकिक मिळवू शकतो ही चर्चा कृतीत आणली तर काय होऊ शकतं त्याची झलक ‘रे राया’ या सिनेमात दाखवण्यात आली आहे. पण मनाला भिडणाऱ्या संघर्षाची जोड न दिल्याने हा प्रयत्न केवळ वरवरचा वाटतो.
गावातून शहरात आलेला धावपटू आदेश (भूषण प्रधान) एका मागोमाग एक पदकं मिळवत सुवर्णपदकावरही आपलं नाव कोरतो. या प्रवासातील एका टप्प्यावर मानाचा समजला जाणारा शिव छत्रपती पुरस्कार आपल्यालाच मिळेल अशी त्याला खात्री असते, पण तसं होत नाही. पुरस्कार न मिळाल्याने दु:खी झालेला आदेश प्रेयसी स्मिता (संस्कृती वालगुडे) आणि मित्र श्याम (नयन जाधव) यांना सोडून गावाकडे जातो. तिथे त्याला बेचकीने आंबे पाडणारा अचूक नेमबाज वसू (हंसराज जगताप), भुकेपोटी चोरी करून पळणारा राहुल (विवेक चाबुकस्वार) आणि डोंबाऱ्याचा खेळ करून पोट भरणारा आकाश (सुदर्शन पाटील) ही तीन मुलं दिसतात. त्यांना पाहून आदेशच्या मनात एक विचार येतो. त्यांना घेऊन आदेश शहरात येतो आणि आपल्या नव्या प्रवासाला सुरुवात करतो.
एक सुंदर विचार या सिनेमाद्वारे शिंदे यांनी मांडला असला तरी या विचारावर तितकाच सुरेख सिनेमा बनवण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींची उणीव भासते. सिनेमा सुरू झाल्यापासूनच नीट पकड घेत नाही. आदेशच्या बालपणीचा प्रवास, खेळाच्या शिक्षकांचा विश्वास, तरीही राजकारणामुळे संधी न मिळणं, मग अचानक मिळालेल्या संधीचं आदेशने सोनं करणं, तिथून थेट मोठेपणी एका मागोमाग एक पदकं जिंकणं, पुरस्कार न मिळाल्याने नाराज होऊन गावाकडे जाणं, तिथे तीन मुलांचे गुण पाहून प्रभावित होणं, त्यांना शहरात आणून धावपटू, नेमबाज आणि जिमनॅस्टिक बनवणं, एक एक स्पर्धा जिंकत तिघांचंही राष्ट्रीय पातळीवरही विजयी होणं या सर्व प्रवासात संघर्ष कुठेच जाणवत नाही. वास्तवात जर यश इतक्या सहजपणे मिळालं असतं, तर जीवन खूपच सोपं झालं असतं.
खेळाच्या या सिनेमात प्रेमाचा ट्रॅकही घुसडण्यात आला आहे, जिला काही अर्थच नाही. श्रीमंत पित्याची कन्या असलेली स्मिता आदेशवर प्रेम करत असते. पण तो मात्र तिला कस्पटासमान मान देतो. तरीही ती पुन: पुन्हा त्याच्या मदतीला धावते. आदेशचा मित्र श्याम नेमकं काय करतो तेच समजत नाही. तो आदेशच्या तीन मुलांचा फायनान्सर बनतो. शेवटच्या टप्प्यातील तीनही स्पर्धा चांगल्या रंगल्या आहेत, पण आधीच्या उणीवांमुळे त्या फारशा प्रभवी वाटत नाहीत. ‘रे राया...’ हे टायटल साँग चांगलं झालं आहे. इतर गाणी मात्र प्रभावहीन आणि कथेच्या गतीत व्यत्यय आणणारी आहेत. तांत्रिकदृष्ट्याही हा सिनेमा सामान्य दर्जाचाच आहे. मेकअपचीही बोंब आहे.
भूषण प्रधानने साकारलेली व्यक्तिरेखा या सिनेमाचा हूक आहे. यासाठी भूषणने खूप मेहनत घेण्याची गरज होती, पण तो नेहमीसारखाच भूषण वाटतो. नेमबाजाची भूमिका सहजपणे साकारत हंसराज जगतापने पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध केलं आहे. विवेक चाबुकस्वार काहीसा कन्फ्युज वाटला. त्या तुलनेत नवख्या सुदर्शन पाटीलने बरं काम केलं आहे. संस्कृती वालगुडे केवळ ग्लॅमडॅाल आहे. नयन जाधव, उदय टिकेकर, मल्हार दांडगे यांनी छोट्याशा भूमिकांमध्ये लक्ष वेधून घेतलं आहे.
हा सिनेमा तितकासा चांगला बनला नसला तरी यातील विचार जरी प्रेक्षकांपर्यंत पोहोचला तरी दिग्दर्शक आणि सिनेमाच्या टिमने घेतलेल्या मेहनतीचं सोनं होईल. असं असलं तरी फार अपेक्षा ठेवून सिनेमा पाहायला जाणं चुकीचं ठरेल.
दर्जा - **
सिनेमा - रे राया
निर्माते - अजय सुखेजा
कथा/पटकथा/संवाद - किरण बेरड
दिग्दर्शक/गीतकार - मिलींद शिंदे
कलाकार - भूषण प्रधान, संस्कृती वालगुडे, उदय टिकेकर, अभिजित चव्हाण, विवेक चाबुकस्वार, हंसराज जगताप, सुदर्शन पाटील, नयन जाधव, प्रकाश धोत्रे, मल्हार दांडगे
हेही वाचा -
ध्येयवेड्या तरुणाच्या जिद्दीची कहाणी