काही कलाकार आपल्या कतृत्वानं इतके मोठे होतात की, त्यांचे सिनेमे कधी येणार याची रसिक आतुरतेनं वाट पाहत असतात. रजनीकांतही यापैकीच एक आहेत. त्यामुळंच दिग्दर्शक एआर मुरुगादॅास आता मोठ्या पडद्यावर रजनीकांत यांचा 'दरबार' भरवणार आहेत.
रजनीकांत यांचा एक आपला वेगळा चाहतावर्ग आहे. जो त्यांच्या सिनेमांची केवळ चातकासारखी वाट पहात नाही, तर त्यांच्या सिनेमांचा तूफान व्यवसाय करण्यासही मदत करतो. आपल्या एखाद्या आराध्य देवतेप्रमाणं रसिक रजनीकांतच्या सिनेमांचं स्वागत करतात हे आजवर सर्वांनीच पाहिलं आहे. 'कबाली', 'काला', '२.०' या रजनीकांत यांच्या सिनेमांचं रसिकांनी जंगी स्वागत केलं होतं. आता तर रजनीकांतचा 'दरबार' मोठ्या पडद्यावर भरणार असल्यानं नक्कीच काहीतरी वेगळं पहायला मिळेल यात शंका नाही.
तेलुगू आणि तमिळ चित्रपटांसोबतच 'गजनी', 'हॅालीडे - इ सोल्जर इज नेव्हर आॅफ ड्यूटी' आणि 'अकीरा' या हिंदी सिनेमांचं दिग्दर्शन करणारे एआर मुरुगादॅास आता आपल्या आगामी सिनेमाकडं वळले आहेत. त्यांच्या या सिनेमाचं शीर्षकच 'दरबार' आहे. या सिनेमात रजनीकांत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 'दरबार'चं पहिलं पोस्टर नुकतंच सोशल मीडियाच्या माध्यमातून रसिकांसोबत शेअर करण्यात आलं आहे. काळ्या रंगाची बनियान परिधान केलेले रजनीकांत आणि त्यांच्या चेहऱ्यावरील भाव 'दरबार'च्या पोस्टरकडे लक्ष वेधून घेतात.
'दरबार'च्या निमित्तानं मुरुगादॅास प्रथमच रजनीकांत यांच्यासोबत काम करत आहेत. हा सिनेमा पुढल्या वर्षी पोंगलच्या मुहूर्तावर म्हणजेच १४ जानेवारीला प्रदर्शित करण्यात येणार आहे. अॅक्शन-थ्रीलर असलेल्या या तमिळपटाचं लेखनही मुरुगादॅास यांनीच केलं आहे. या सिनेमात रजनीकांत यांच्या जोडीला नयनतारा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. याशिवाय सुनील शेट्टी, निवेथा थॅामस, योगी बाबू, थंबी रमैया, सिम्रन या दक्षिणात्य कलाकारांसोबत प्रतिक बब्बर हा मराठमोळा अभिनेता आणि दलिप ताहिल हा हिंदी सिनेसृष्टीतील ओळखीचा चेहराही या चित्रपटात दिसणार आहे.
हेही वाचा -
राशीचं भविष्य मांडणार 'आलंय माझ्या राशीला'
सायली-शिवानी बनल्या सलमानच्या नायिका!