Advertisement

दिग्गजांकडून साफ निराशा...


दिग्गजांकडून साफ निराशा...
SHARES

गुलजार, मणिरत्नम, ए. आर. रेहमान, करण जोहर, नसिरुद्दीन शाह अशी दिग्गज मंडळी एखाद्या चित्रपटात एकत्र आली असतील तर ती प्रेक्षकांच्या दृष्टीनं पर्वणीच ठरायला हवी. मात्र नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ओके जानूमध्ये तसं अजिबात घडलेलं दिसत नाही. मणिरत्नम यांच्या कच्च्या कथा-पटकथेच्या पायाला संवादारूपी डोलारा देण्यात गुलजारही येथे अपयशी ठरलेले दिसतात. ए. आर. रेहमानचे संगीत अगदीच सुमार आहे. नाही म्हणायला आदित्य रॉय कपूर-श्रद्धा कपूर आणि नसिरुद्दीन शाह-लीला सॅमसन या जोड्यांनी या चित्रपटाला सावरण्याचा खूप प्रयत्न केलाय. मात्र दिग्गजांकडून मोठ्या चुका झाल्यामुळे हा चित्रपट साफ निराशाजनक अनुभव ठरतो.

एकीकडे साथियासारखा सहजसुंदर चित्रपट देणाऱ्या शाद अलीने 15 वर्षांनंतर आपल्याच या कलाकृतीची नक्कल करण्याचा प्रयत्न केलाय. तो त्याच्या भलताच अंगलट आला आहे. दुसरीकडे खुद्द मणिरत्नमनं आपल्या दोन वर्षांपूर्वीच्या ओ कादल कनमणीचा रीमेक करताना स्वतः दिग्दर्शन करण्याऐवजी ती जबाबदारी शाद अलीकडे दिलीय. ही गोष्ट आहे आदि (आदित्य रॉय कपूर) आणि ताराची (श्रद्धा कपूर). व्हिडीओ गेम डेव्हलपिंगमध्ये आदिला रस असतो. त्याला या क्षेत्रात आणखी पुढं जाण्यासाठी अमेरिकेला जायचं असतं. ताराला पॅरिसमध्ये जाऊन आर्किटेक्चरचं पुढील शिक्षण घ्यायचं असतं. हे दोघंही अचानक मुंबईत भेटतात आणि एकमेकांकडे आकर्षित होतात. आदि आपल्या भावाचा मित्र गोपी श्रीवास्तव (नसिरुद्दीन शाह) यांच्या घरी राहत असतो. त्यांची पत्नी चारू श्रीवास्तव (लीला सॅमसन) या अल्झाययरनं आजारी असतात. हॉस्टेलमध्ये राहणारी तारा कालांतरानं आदिबरोबरच गोपी यांच्या घरी लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहू लागते. आदि आणि ताराचे करिअरचे मार्ग वेगळे असले तरी ते एकमेकांची कंपनी एन्जॉय करायला लागतात. मात्र लग्नाच्या बंधनात आणि एकमेकांमध्ये भावनिक गुंतवणूक न करण्याचंही ते ठरवतात. मात्र जेव्हा आदिला अमेरिकेमध्ये आणि ताराला पॅरिसमध्ये जाण्याची संधी मिळते तेव्हा मात्र मग त्यांची घुसमट होऊ लागते. या घुसमटीमधून ते कसे बाहेर पडतात, याचा उलगडा प्रत्यक्ष चित्रपटातच पाहावा.

मणिरत्नम हे खूप चांगले कथा-पटकथाकार आहेत. मात्र, यावेळी त्यांची लेखनात मोठी गडबड झालीय. हा चित्रपट प्रेम, विवाह, लिव्ह इन रिलेशनशीप, करिअर या सर्वांबद्दल भाष्य करतो. मात्र या सगळ्यामधून लेखक-दिग्दर्शकाला नेमकं काय सांगायचंय हेच स्पष्ट होत नाही. त्यामुळेच संपूर्ण चित्रपट रेंगाळत रेंगाळत पुढे सरकतो. चित्रपटाचा शेवट तर अत्यंत निराशा करणारा आहे. कथा-पटकथेतच काही दम नसल्यामुळे गुलजार यांच्यासारखा प्रतिभाशाली लेखकदेखील यावेळी संवादलेखन करताना रंग हरवून बसला आहे. या सर्व निराशाजनक खेळात या चित्रपटाला बऱ्यापैकी सावरलं आहे ते पडद्यावर दिसणाऱ्या कलावंतांनी. आशिकी 2मुळे प्रसिद्धीस आलेली आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर या जोडीनं चांगली कामगिरी केलीय. या दोघांमध्ये विशेष लक्षात राहते ती श्रद्धा. ताराच्या भूमिकेमधल्या सगळ्या शेडस तिनं छान दाखवल्या आहेत. नसिरुद्दीन शाह यांनी नेहमीप्रमाणेच आपली छोटीशी भूमिकाही चोख निभावली आहे. त्यांना तेवढीच साथ लीला सॅमसन यांनी दिली आहे. या दोघांची केमिस्ट्री एवढी छान जमलीय की, काही वेळी चित्रपटाची मुख्य जोडी हीच नाही ना? असाही प्रश्न पडतो. अभिनयापाठोपाठ रवी के. चंद्रन यांच्या फोटोग्राफीला दाद द्यावी लागेल. त्यांनी मुंबई शहराचा मूड आपल्या कॅमेऱ्यातून छान पकडला आहे. ए. आर. रेहमान यांची संगीताच्या आघाडीवर अलीकडच्या काळातील ही सर्वाधिक सुमार कामगिरी असावी. नवीन काहीच हाताशी नसल्यामुळे त्यांनी आपलं जुनंच हम्मा हम्मा गाणं पुन्हा नव्यानं वापरलं आहे. परंतु, दिग्दर्शक शाद अलीला त्याचाही नीट वापर करता आलेला नाही. थोडक्यात वर्षाची सुरुवात निराशाजनक झाली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा