Advertisement

निर्माता अमोल कागणेने अभिनेता बनण्यासाठी वाढवलं वजन!

‘मान्सून फुटबॉल’मध्ये अमोलसोबत सागरिका घाटगे, चित्रांशी रावत, विद्या माळवदे, डेलनाझ इराणी, प्रीतम कागणे, उषा नाईक आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. या अभिनेत्री चित्रपटात साडी नेसून फुटबॉल खेळताना दिसतील.

निर्माता अमोल कागणेने अभिनेता बनण्यासाठी वाढवलं वजन!
SHARES

चित्रपटांच्या प्रेमापोटी निर्मितीकडे वळलेले काही हौशी निर्माते कालांतराने एखाद-दुसऱ्या चित्रपटात छोट्याशा भूमिकेत झळकत आपली हौस पूर्ण करतात. तर काही जण नंतर दिग्दर्शनाकडे वळतात. अमोल कागणे हा तरुण निर्माताही आता अभिनयाकडे वळला आहे. आपल्या भूमिकेसाठी त्याने सहा किलो वजनही वाढवलं आहे.


मान्सून फुटबॉलमधून इनिंग्ज 

‘हलाल’, ‘लेथ जोशी’, ‘३१ ऑक्टोबर’, ‘परफ्युम’ या चित्रपटांची यशस्वी निर्मिती करताना त्याने विविध पुरस्कारांवरही नाव कोरलं आहे. आजवर सहदिग्दर्शक आणि प्रस्तुतकर्ता या जबाबदाऱ्या पार पाडणारा अमोल आता अभिनयात पदार्पण करत आहे. मिलिंद उके दिग्दर्शित "मान्सून फुटबॉल" या बहुचर्चित चित्रपटातून अमोल अभिनयाची इनिंग्ज सुरू करत आहे.


साडी नेसून फुटबॉल

‘मान्सून फुटबॉल’मध्ये अमोलसोबत सागरिका घाटगे, चित्रांशी रावत, विद्या माळवदे, डेलनाझ इराणी, प्रीतम कागणे, उषा नाईक आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. या अभिनेत्री चित्रपटात साडी नेसून फुटबॉल खेळताना दिसतील. गृहिणी बनल्यावर आपली पुसली गेलेली ओळख पुन्हा निर्माण करण्यासाठी त्यांनी दिलेला लढा या चित्रपटात पहायला मिळेल. हा चित्रपट जानेवारीमध्ये प्रदर्शित करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.


गुजराती व्यक्तीची भूमिका

‘मान्सून फुटबॉल’ या चित्रपटातील भूमिका आपल्यासाठी मोठी संधी असल्याचं मानणारा अमोल याबाबत म्हणाला की, या चित्रपटात माझ्या वाट्याला गुजराती व्यक्तीची भूमिका आली आहे. मी मराठी असल्याने ही भूमिका माझ्यासाठी आव्हानात्मक होती. मेकअप दादांकडून मी गुजरातीचा लहेजा समजून घेतला. गुजराती मित्रांबरोबर राहून त्यांच्या वागण्या-बोलण्याचाही बारकाईने अभ्यास केला. या भूमिकेसाठी जवळपास सहा किलो वजनही वाढवलं आहे.


२६ नाटकं 

‘मान्सून फुटबॉल’ या चित्रपटासोबतच ‘बाबो’, ‘अहिल्या’, ‘झोलझाल’, ‘भोंगा’, ‘तुझं माझं अॅरेंज मॅरेज’ या चित्रपटामध्येही अमोल अभिनेत्याच्या रूपात झळकणार आहे. पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातून अमोलनं नाट्यशास्त्राचं शिक्षण घेतलं आहे. आतापर्यंत अमोलनं २६ हून अधिक नाटकं आणि चार चित्रपटांची निर्मिती केली आहे. राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या भारत रंग महोत्सवात त्यानं नाटकही सादर केलं आहे.



हेही वाचा -

‘गॅटमॅट होऊ देना…’ म्हणत अवधूतने छेडला तरुणाईचा सूर

मराठी सिनेमाला मल्याळमचा रॉकींग स्पर्श




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा