डीएननगर - अभिनेता सलमान खान आणि वाद-विवाद यांचं नातं काही नवीन नाहीये. पण आता सलमानचा बॉडीगार्ड शेरादेखील मागे राहिलेला नाहीये. स्वत:च्याच मित्राला जबर मारहाण केल्याचा गुन्हा शेराविरूद्ध मुंबईच्या डीएननगर पोलीस ठाण्यात दाखल झालाय.
उपलब्ध माहितीनुसार मंगळवारी रात्री फिर्यादी अतहर उमर कुरेशी हा त्याच्या गाडीतून लिंक रोडवरून जात होता. शेराची गाडी दिसताच त्यानं गाडी थांबवली. अतहर आणि त्याचा मित्र अजय यांचं तेव्हा फोनवर संभाषण सुरू होतं. शेरा तिथे असल्याचं कळताच अजयने फोन शेराला देण्यास सांगितलं. त्यानुसार अतहरने शेराला फोन दिला. शेरा आणि अजयमध्ये फोनवर बाचाबाची आणि शिवीगाळ झाली. रागातच शेरानं फोन बंद करत अतहरलाही शिव्या घतल्या. याचा जाब विचारला, म्हणून अतहरलाही मारहाण केली.
अतहरचा आरोप केला आहे की, शेरा आणि त्याच्या मित्रांनी त्याला राॅडनं तसंच बंदुकीचा धाक दाखवून रस्त्यात मारहाण केली.
या प्रकरणी डीएननगर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान 326, 506 (2), 323, 504, 34 तसेच हत्यार कायद्याच्या 3, 25, 27 कलमांतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती मुंबई पोलीस प्रवक्ते अशोक दुधे यांनी दिली. या मारहाणीत अतहर ऊमर कुरेशी हे जबर जखमी झाले असून ते अद्यापही रुग्णालयात आहेत. या प्रकरणी पोलिसांनी शेराशी संपर्क साधला असता त्यानं असा कोणताही प्रकार घडला नसल्याचं सांगितलं.
मात्र चौकशी सुरू असून शेराविरोधात पुरावे आढळल्यास त्याला अटक करण्यात येईल असं पोलिसांनी स्पष्ट केलंय.