'लाखात एक माझा फौजी' असं म्हणत प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या 'लागीरं झालं जी' या लोकप्रिय मालिकेने नुकताच ३०० भागांचा टप्पा गाठला. शीतली आणि अज्याची प्रेमकथा प्रेक्षकांनाही भावत आहे, तशीच ती आपलीशी देखील वाटत आहे.
अज्या आणि शीतलीचं प्रेम पुष्पा मामी, भैय्यासाहेब म्हणजेच हर्षवर्धन आणि जयडीच्या डोळ्यात खुपतंय. शीतल आणि अजिंक्यच्या लग्नाला दोन्ही घरातून होकार मिळाल्यामुळे त्यांची अस्वस्थता अजूनच वाढली आहे. रिवाजानुसार मुलगी बघण्याचा कार्यक्रम देखील पार पडतो. अजिंक्य गावात आल्यानंतर जाणूनबुजून गोड मामी, शीतल आणि तिच्या घरच्यांचा पाणउतारा करण्याची एकही संधी सोडत नाही आहे.
शीतल आणि अजिंक्यच्या लग्नाची घरात चाललेली तयारी बघून जयश्री अस्वस्थ होते. आपल्या हातून सगळं सुटतंय या विचाराने ती बिथरते आणि अजिंक्यच्या आधी माझं लग्न करा, असं घरी सांगते. जयश्रीच्या या मागणीने सगळ्यांनाच धक्का बसतो. शीतल आणि अजिंक्यच्या लग्नात अडथळा निर्माण करण्याचा जयडीचा हा डाव यशस्वी होईल का? जयडी शीतल आणि अज्याला एकमेकांपासून तोडेल का? हे प्रेक्षक लवकरच पाहू शकतील.