आरेमध्ये 76 हेक्टर वनजमीन असल्याचे प्रतिज्ञापत्र वन विभागाने गुरुवारी राष्ट्रीय हरित लवादाकडे सादर केले. आरेत 2 हजार 076 हेक्टर जागा असून त्यातील 586 हेक्टरचा विकास झालेला आहे. पण वन विभाग केवळ 76 हेक्टर वनजमीन आहे असे म्हणत असल्याने पर्यावरण प्रेमींना चांगलाच धक्का बसला आहे. त्यामुळे आरेतील 1 हजार 414 हेक्टर वनजमीन गेली कुठे? असा प्रश्न वनप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.
आरेसंदर्भातील कागदपत्रे सादर करण्याचे आदेश असतानाही वन विभागाला काही कागदपत्रे सापडता सापडत नव्हती. त्यामुळे लवादाकडे तारीख पे तारीख मागत वन विभाग वेळ मारून घेत होते. अखेर गुरुवारी वन विभागाने प्रतिज्ञापत्र सादर करत आरेत 76 हेक्टर वनजमीन असल्याचे नमुद केले आहे. 2076 हेक्टर जागैपैकी 586 हेक्टरचा विकास झालेला असताना आरेत किमान 1 हजार 414 हेक्टर जमीन वनजमीन म्हणून असायला हवी. असे असताना आरेत केवळ 76 हेक्टर जागा असल्याचे वन विभाग सांगत आहे.
वन विभागाची ही लपवाछपवी असून आरेची वनजमीन विकासासाठी खुली करण्यासाठीचा वन विभागाचा हा डाव असल्याचा आरोप सेव्ह आरेचे सदस्य बिजू अगस्तीन यांनी केला आहे. "वन विभागाने कितीही लपवाछपवी केली, कागदपत्र दडवून ठेवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही वनजमिनीची सर्व कागदपत्रे शोधून काढू आणि वन विभाग आणि इतर सरकारी यंत्रणाचा आरे घशात घालण्याचा डाव हाणून पाडू," असा विश्वासही अगस्तीन यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान लवादात पुढील सुनावणी 22 मे रोजी होणार आहे.
फिल्मसिटी ही वनजमीनच
आरेत 76 हेक्टरच वनजमीन असल्याच्या वन विभागाच्या प्रतिज्ञापत्रामुळे पर्यावरण प्रेमी आश्चर्यचकीत झाले आहेत. पण त्याहीपेक्षा मोठा धक्का या प्रतिज्ञापत्राद्वारे वनविभागाने दिला आहे. जी 76 हेक्टर जमीन वनजमीन असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे ती जागा फिल्मसिटीची आहे. याचा अर्थ फिल्मसिटी ही वनजमीन आहे, असा होत असल्याने वन विभागाच्या या दाव्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. विकसित झालेली जागा वनजमीन कशी आहे? वनजमीन असेल तर मग त्यावर फिल्मसिटीचा विकास कसा असा प्रश्न? आता यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.