आयुर्वेदामध्ये तुळशीला फार महत्व आहे. आरोग्य आणि पर्यावरण यांचे संतुलन राखण्यासाठी तुळस मोलाची भूमिका बजावते. हाच संदेश तरुणाईपर्यंत पोहोचवण्यासाठी शुक्रवारी अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर मुलुंडमध्ये एक खास उपक्रम राबवला गेला. मुलुंड मधील नागरिकांना मोफत तुळशीची रोपे यावेळी वाटण्यात आली.
या निमित्ताने मुलुंड परिसरात जवळपास 130 रोपांचे वाटप करण्यात आले. पर्यावरण रक्षणाची गरज लक्षात घेऊन 'संकल्प' या संस्थेद्वारे हा उपक्रम राबवण्यात आला. तुळशीच्या माध्यमातून प्रदूषण कमी व्हावे, तसेच नागरिकांचे आरोग्य निरोगी रहावे, हा या मागचा उद्देश असल्याचे संकल्प संस्थेच्या अध्यक्षा पल्लवी धुरी यांनी सांगितले. 'तुळस कशासाठी ? नागरीकांच्या आरोग्यासाठी, मोकळा श्वास घेण्यासाठी आणि प्रदूषणमुक्त वातावरणासाठी हा संदेश या निमित्ताने देण्यात आला.