निसर्ग चक्रीवादळ हळुहळू मुंबईच्या दिशेनं सरकत असल्यानं मुंबईतील अनेक भागात जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. या वादळामुळं रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघर इथं मुसळधार ते अतिमुसळधार पाऊसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. त्याशिवाय, चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या किनारपट्टीनजीक राहणाऱ्या रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आलं आहे.
चक्रीवादळाचा प्रभाव बुधवारी आणि गुरूवारी महाराष्ट्रावर पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर ३ जूनला चक्रीवादळ धडकण्याचा अंदाज आहे. मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा - निसर्ग चक्रीवादळ मुंबईपासून अवघ्या १९० कि.मी. अंतरावर
चक्रीवादळामुळे लाटा नेहमीच्या उंचीपेक्षा १ ते २ मीटर अधिक उंच उसळण्याची शक्यता आहे. बुधवारी सकाळी १० आणि रात्री १० च्या सुमारास अनुक्रमे ४.२६ आणि ४.०६ मीटर उंचीच्या लाटा मुंबईमध्ये उसळण्याची शक्यता आहे. तर ४ जून रोजी सकाळी ११ च्या सुमारास ४.५६ मीटर इतकी लाटांची उंची असणार असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
हेही वाचा - मुंबईच्या दिशेनं चक्रिवादळ, काय कराल आणि काय नाही?
अनेक वर्षांनंतर मुंबईत वादळाची शक्यता वर्तवण्यात आल्यानं अनेकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. चक्रीवादळामुळं घरांचं नुकसान होण्याची शक्यता असते. परंतु, वादळी वारा, तुफानी पावसामुळं मुंबईतील जुन्या व कमकुवत इमारतींना धोका निर्माण होण्याची शक्यता फारशी नसल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईत उपकरप्राप्त (सेस) इमारतींची संख्या १६ हजारांपर्यंत आहे. अनेक इमारती जुन्या, जीर्ण झाल्या आहेत. त्यांना असलेला धोका हा वारा, पावसाच्या वेगावर अवलंबून असेल. मात्र, या इमारतींनी बरेच पावसाळे पाहिलेले असून त्यापैकी बहुतांश इमारती अंतर्गत भागात आहेत.
हेही वाचा -
'निसर्ग' चक्रीवादळ अलिबाग समुद्र किनाऱ्याला धडकणार
निसर्ग चक्रीवादळासाठी नौदल सज्ज, 5 बचाव पथकासह, 3 डायव्हिंग पथकं तयार