दहिसर (dahisar) ते मिरा-भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेतील उत्तन, डोंगरी येथील कारशेडच्या कामासाठी 1 हजार 406 झाडे कापण्यासाठी मिरा-भाईंदर पालिकेच्या (mbmc) उद्यान विभागाने परवानगी दिली आहे.
तसेच आणखी 9 हजार 900 झाडांच्या कापणीसाठी उद्यान विभागाने जाहिर सूचना प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे उत्तन कारशेडसाठी आता एकूण 11 हजार 306 झाडे कापली (tree cutting) जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात केल्या जाणाऱ्या वृक्षतोडीला पर्यावरणप्रेमी, पर्यावरण तज्ज्ञांकडून विरोध केला जात आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (mmrda) मेट्रो 9 (metro 9) मार्गिका बांधली जात आहे. या मार्गिकेसाठी भाईंदरमधील (bhayandar) राई, मुर्धा, मोर्वा येथे कारशेड प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र तेथे कारशेड बांधण्यास नागरिकांनी विरोध केल्याने राज्य सरकारला कारशेडची जागा बदलावी लागली.
त्यानुसार उत्तन, डोंगरी येथे कारशेड (carshed) बांधण्याचा निर्णय घेऊन राज्य सरकारने कारशेडच्या बांधकामास मंजुरी दिली. त्यानंतर 59.65 हेक्टर जागेवर कारशेडचे बांधकाम करण्याच्यासाठी एमएमआरडीए कामाला लागले.
कारशेडच्या कामासाठी डोंगरीतील झाडे कापावी लागणार असल्याने एमएमआरडीएने गेल्या वर्षी 1 हजार 406 झाडे कापण्यासाठी पालिकेच्या उद्यान विभागाकडे परवानगी प्रस्ताव पाठवला होता. उद्यान विभागाने त्यावर सूचना-हरकरती मागवल्या.
तेथील वृक्षतोडीला स्थानिकांनी पर्यावरणप्रेमी-तज्ज्ञांनी विरोध करत मोठ्या संख्येने सूचना-हरकती सादर केल्या. मात्र त्या सूचना-हरकतींचा कोणताही विचार न करता १ हजार ४०६ झाडे तोडण्यास उद्यान विभागाने परवानगी दिली.
दरम्यान कारशेडच्या कामासाठी 1 हजार 406 इतकीच झाडे कापली जाणार असे वाटत असताना आता झाडांची संख्या आणखी वाढली आहे. कारण आता कारशेडसाठी 1 हजार 406 नव्हे तर एखूण 11 हजार 306 झाडे कापली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मिरा-भाईंदरच्या पालिकेच्या उद्यान विभागाच्या 12 मार्चच्या एका जाहीर सूचनेतून कारशेडच्या कामासाठी आणखी 9 हजार 900 झाडे कापली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. एमएमआरडीएकडून उत्तन कारशेडच्या कॉमसाठी 9 हजार 900 झाडे कापण्यासाठीचा परवानगी मागण्यात आला आहे.
त्यानुसार पालिकेच्या उद्यान विभागाने आवश्यक ती कार्यवाही सुरु केली आहे. त्यासाठीची जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात आली असून सूचना-हरकती मागवण्यात आल्या आहेत.
एकूणच उत्तन कारशेडसाठी आता 11 हजार 306 झाडे तोडली जाणार असून ही संख्या बरीच मोठी आहे. इतक्या मोठ्या संख्येने झाडांची कत्तल होणार असल्याने स्थानिक, पर्यावरणप्रेमी, पर्यावरण तज्ज्ञांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा