नोव्हेंबर महिन्यातही 'आॅक्टोबर हिट' ने त्रस्त झालेल्या मुंबईकरांना मंगळवार आणि बुधवारी सकाळी घटलेल्या तापमानाने दिलासा दिला आहे. मागील २४ तासांत मुंबईच्या तापमानात ३ अंश सेल्सिअसने घट झाल्याने मुंबईकरांना सकाळ आणि सायंकाळी हवेतील गारवा अनुभवायला मिळत आहे. काश्मीरमध्ये होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे मुंबईसह राज्यातील तापमान घटल्याचं हवामान विभागाचं म्हणणं आहे.
हवामान विभागाच्या वेबसाईटवरील नोंदीनुसार, मंगळवारी मुंबई शहराचं कमाल तापमान ३२.४ अंश सेल्सिअस, आणि उपनगरातील तापमान ३२.८ अंश सेल्सिअस एवढं होतं. तर बुधवारी सांताक्रूझ कमाल (३२.८ अं.सेल्सि.) किमान (२०.४ अं. सेल्सि.) आणि कुलाबा (३२.४ अं.सेल्सि.) किमान (२०.५ अं. सेल्सि.) तापमान नोंदवण्यात आलं. पुढील २४ तासांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबईसह कोकणात उत्तरेकडून आलेले गार वारे वातावरण घटवण्यास कारणीभूत ठरत आहेत. तर हवेतील आर्द्रतेचं प्रमाण ७० ते ७५ टक्के असल्याने सकाळी समुद्राकडून वाहणारे कोरडे वारे हवेत आल्हाददायकपणा घेऊन येत आहेत. त्यामुळे मुंबईकरांना सकाळच्या वेळेस गारव्याचा अनुभव येत आहे.
मुंबईत खऱ्या अर्थाने थंडी सुरू होण्यास डिसेंबर उजाडेल असं वेधशाळेचं म्हणणं असलं, तरी हे थोडफार घटलेलं तापमान मुंबईकरांना मोठा दिलासा देत आहे. येत्या २ दिवसांत तापमानात आणि २ अंश सेल्सिअसने घट होईल, असा वेधशाळेचा अंदाज आहे.
हेही वाचा-
मुंबईत 10 टक्के पाणी कपातीची शक्यता
अाणिक-वडाळा फ्लायओव्हरच्या खाली होणार जाॅगिंग पार्क