भारतीय संस्कृतीत नद्यांना केवळ जीवनदायीनीच नव्हे, तर अध्यात्मिक उर्जेचे स्त्रोतही मानले जाते. पण सद्यस्थितीत भारतातील बहुसंख्य नद्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्या असून काही नद्या नामशेष होत चालल्या आहेत. जे पर्यावरणासाठी अत्यंत घातक आहे.
एखाद्या व्यक्तीला दोन दिवस पाणी न देता एका खोलीत बंद ठेवले आणि नंतर त्याला एक ग्लास पाणी दिले तर, ते पाणी त्या व्यक्तीसाठी जीवनदान ठरेल. हे झाले फक्त एक ग्लास पाण्याचे. पण जर नद्याच शिल्लक राहिल्या नाही, तर भविष्यात आपल्याला पिण्यासाठी एक ग्लासही पाणी मिळणे कठीण होऊ शकते. त्यामुळे नद्यांचे संवर्धन करणे ही आपलीच जबाबदारी आहे, याच उद्देशातून 'इशा फाऊंडेशन'च्या वतीने 'रॅली फॉर रिव्हर' ही मोहीम राबवली जात आहे.
गंगा, कृष्णा, नर्मदा, कावेरी यांसारख्या देशातील अनेक महत्त्वपूर्ण नद्या प्रदूषित होऊन आकसत चालल्या आहेत. या नद्यांच्या संवर्धनासाठी आपण वेळीच पावले उचलली नाही तर, आपल्या पुढच्या पिढीचे जीवन अत्यंत संघर्षमय होऊन बसेल.
- सद्गुरु जग्गी वासुदेव, संस्थापक 'इशा फाऊंडेशन'
हजारो वर्षांपासून या नद्यांनी आपल्याला जीवन दिले आहे. आता मरणासन्न अवस्थेत पोहोचलेल्या या नद्यांना पुनरूज्जीवित करण्याची गरज आहे. त्यासाठी आपल्याला नद्यांच्या किनारी प्रत्येक एक किमी अंतरावर वृक्षारोपण करायला हवे. भारतातील जंगल देखील नष्ट होत चालले आहे. त्यामुळे सरकारी जमिनीवर या जंगलाची निर्मिती व्हायला हवी. शेतकऱ्यांच्या जमिनीवर फळांसह विविध झाडांची लागवड व्हायला हवी. त्यातून जमिनीतील ओलावा कायम राहील आणि नद्या वर्षानुवर्षे टिकून राहतील. म्हणूनच नद्यांच्या संवर्धनासाठी काढण्यात आलेल्या 'रॅली फॉर रिव्हर' या मोहिमेत भारतातील प्रत्येक व्यक्तीने सहभागी व्हावे, असे त्यांनी आवाहन केले.
'इशा फाऊंंडेशन'चे संस्थापक, सद्गुरु जग्गी हे स्वत: कन्याकुमारीपासून ते दिल्ली असा ७,००० किमीचा प्रवास करणार आहेत. १६ राज्यांमध्ये ही रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीला ३ सप्टेंबरपासून सुरूवात होणार असून रॅलीची सांगता २ ऑक्टोबर रोजी दिल्लीत होणार आहे.
हेही वाचा -
मुख्यमंत्री म्हणताहेत 'नद्या वाचवा'!
नद्यांच्या पुनर्जीवनासाठी पर्यावरणप्रेमी सरसावले