महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी करण्यात आली खरी...मात्र आजही बहुतांश नागरिकांच्या घरात थोड्या प्रमाणात का होईना, पण प्लास्टिक आढळते. प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या किंवा इतर प्लास्टिकचं सामान हे घरा-घरात आहे. अनेक वेळा हे प्लास्टिक आपण कचऱ्यात टाकतो किंवा भंगारवाल्याला देतो. पण आता प्लास्टिक बंदी झाल्यामुळे हे सर्व मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे आता घरात पडलेल्या प्लास्टिकची व्हिलेवाट कशी लावायची? हा मोठा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. पण टेन्शन घेऊ नका. 'ऊर्जा फाऊंडेशन'तर्फे गेल्या अनेक वर्षांपासून प्लास्टिकमुक्तीची मोहीम राबवली जात आहे.
प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण आणि प्लास्टिकचा अतिवापर याबद्दल अनेकदा राजकीय, प्रशासकीय यंत्रणांना लक्ष्य केले जाते. मात्र डोंबिवलीतल्या ऊर्जा फाऊंडेशननं प्लास्टिकचा वापर कमी व्हावा आणि प्रदूषण रोखले जावे यासाठी स्वत: पुढाकार घेतला आहे. 'माझा प्लास्टिक कचरा ही माझीच जबाबदारी' असल्याचं आवाहन ऊर्जा फाऊंडेशनतर्फे करण्यात येत आहे. यावर्षीचे त्यांचे १५ वे अभियान ८ एप्रिल म्हणजेच रविवारी राबवण्यात येणार आहे. डोंबिवलीतल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालयात आणि ठाण्यातल्या सर्व्हिस रोडला असलेल्या इटर्निटी कॉम्प्लेक्स इथे सकाळी १० ते ११.३० या वेळेत हे अभियान होणार आहे.
२०१६ साली उर्जा फाऊंडेशनची स्थापना झाली. तेव्हापासून आम्ही प्लास्टिकमुक्तीसाठी १४ अभियानं राबवली आहेत. या १४ अभियानांतून जवळपास २७ टन प्लास्टिक आम्ही जमा केलं आहे. ८ एप्रिलला होणारे आमचे १५ वे अभियान आहे. गेल्या ३ वर्षांपासून ऊर्जा फाऊंडेशन प्लास्टिक कचरा कमी करणे तसेच वापरलेल्या प्लास्टिकचा पुनर्वापर आणि पुन:प्रक्रिया करण्यासाठी काम करत आहे. माझा प्लास्टिक कचरा ही माझी जबाबदारी या मोहिमेत शाळा, महाविद्यालये आणि इतर निवासी संकुलांनी सहभाग घेतला आहे. ऊर्जा फाऊंडेशनतर्फे शाळा, महाविद्यालय आणि निवासी संकुलांमद्ये जाऊन प्रचार केला जात आहे, अशी माहिती ऊर्जा फाऊंडेशनच्या एका सदस्यानं दिली.
'माझा कचरा ही माझी जबाबदारी' या चळवळीला मुंबई, डोंबिवली, ठाणे इथून चांगला प्रतिसाद मिळत आहे. वेगवेगळ्या भागातून येणारा कचरा पुण्याच्या रूद्रा एन्व्हायर्नमेंटल सोल्युशन्स कंपनीत पोहोचवला जातो. या कंपनीत इको फ्रेंडली पद्धतीनं पॉलिफ्युएल तयार करण्यात येते. चार तासात मुंबईहून आलेला प्लास्टिक कचरा पुण्याच्या रुद्रा एन्व्हायर्नमेंटमध्ये पोहोचवला जातो. त्यानंतर हे प्लास्टिक मशिन्समध्ये टाकल्यानंतर आठ ते नऊ तासात पॉलिफ्युएल तयार होते. प्लास्टिक कचऱ्यापासून पॉलिफ्युएल बनवण्याची संकल्पना रुद्रा एन्व्हायर्नमेंटल सोल्युशन्सच्या मेधा तडपत्रीकर यांना सुचली. त्यांच्यामुळेच आत्तापर्यंत किती तरी प्लास्टिक कचरा रिसायकल करण्यात आला आहे.
फक्त ऊर्जा फाऊंडेशनच नाही, तर आता अनेक संस्थांनी प्लास्टिकमुक्तीचा ध्यास घेतला आहे. मुंबईची राणी मलिष्कानं देखील #mumbaikiplasticsurgery ही मोहीम सुरू केली आहे.
या अंतर्गत तुमच्याकडे असलेला प्लास्टिक कचरा किंवा तुमच्या सोसायटीतल्या घरांमध्ये असलेला प्लास्टिक कचरा एकत्र करून लोअर परेलच्या रेडिओ एफम ऑफिसमध्ये जमा करायचा आहे. इथून हा प्लास्टिक कचरा पुण्याच्या रूद्रा सोल्युशन्स कंपनीला पाठवण्यात येईल, असं आवाहन मलिष्का करत आहे.
हेही वाचा