पर्यावरणाची गुणवत्ता वाढवून त्याचं संवर्धन होण्यासाठी जनजागृती व्हावी, याच उद्देशाने दरवर्षी 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून पाळला जातो. मात्र पर्यावरणाचा अविभाज्य अंग असलेल्या झाडांची काळजी घ्यायला आपण इतर दिवशी मात्र साफ विसरतो. अनेकदा झाडांवर पोस्टर आणि बॅनर लावण्यासाठी सर्रास खिळे ठोकले जातात. या झाडांवर लोखंडी बार अडकवलं जातं. पण त्यांना वेदना होतात याचा विचारच केला जात नाही. आणि झाडांच्या याच वेदना ओळखून त्यांच्या जखमांवर फुंकर घालण्याचं काम मुंबईतील काही तरुणांनी सुरू केलं आहे.
'पेन फ्री ट्री' म्हणजेच वेदनामुक्त झाड असं या उपक्रमाच नाव असून मुंबईतील आंघोळीची गोळी आणि जय फाउंडेशन या संस्थांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. १ एप्रिलपासून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. प्रथम दादरच्या शिवाजी पार्क परिसरातील झाडांना वेदनामुक्त करण्यात आलं. याशिवाय कल्याण, डोंबिवली, मेट्रो चैाक आणि अंबरनाथ या परिसरातील झाडांमधील खिळे काढून टाकण्यात आले आहे.
रविवारी 3 जूनला विरारमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाला येथील गुरुमा केयर अॅंड कुयर्स या संस्थेच्या सदस्यांसह स्थानिक नागरिकांनीही भरभरुन पाठिंबा दिला.
बॅनर, पोस्टर घट्ट बसावे म्हणुन खिळे ठोकुन ते झाडांमध्ये अडकवले जातात. झाडांवर ठोकलेले हे खिळे काही काळाने गंजतात आणि तो गंज झाडांच्या खोडात शिरतो. याचा झाडावर परीणाम होउन झाड खंगत जातं. म्हणुन झाडातील खिळे काढुन त्या छिद्रांमध्ये मेण भरुन ते बुजवले जातात.
तुषार वरंग, आंघोळीची गोळीचे सदस्य
दर रविवारी शहरातील विविध भागात ही मोहीम राबवली जाते. विषेशत: महाविद्यालयीन विद्यार्थी यामध्ये सहभागी होतात. या मोहिमेदरम्यान त्यांना झाडांमधून खिळ्यांसोबत लोखंडी गज, स्क्रू ड्रायव्हर, लोखंडी पाइप अशा वस्तू आढळून आल्या असून आतापर्यंत 150 पेक्षा जास्त झाडांना वेदनामुक्त केल्याची माहिती तुषार यांनी दिली.
इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्सच्या रिसर्चनुसार 1970 मध्ये मुंबईत 35 टक्के झाडं होती. ती आता फक्त 13 टक्के शिल्लक आहेत. ही संख्या अशीच कमी होत गेली तर पर्यावरणाचा समतोल राखणे अत्यंत कठीण होऊन बसेल. मग पर्यावरणासोबतच झाडांचं जतन आणि त्यांची देखभाल फक्त 5 जून या दिवसापर्यंत मर्यादित का ठेवावी? रोज का करू नेय? याचा नक्की विचार करा!
हेही वाचा -