परळ - क्लासमेट स्पेल बी आणि रेडियो मिर्चीची स्पेलिंगची स्पर्धा असलेल्या क्लासमेट स्पेल बी सिझन 9 ची सांगता नुकतीच झाली असून, यातील विजेत्यांच्या नावाची घोषणा अभिनेत्री सोहा अली खान यांच्या हस्ते करण्यात आली. मंगळवारी परळच्या आयटीसी ग्रॅण्ड सेंट्रल हॉटेलच्या सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी इएसपीबी सेल्स आणि मार्केटींग विभागाचे प्रमुख नृपेंद्रनाथ ठाकूर,स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बीचे कार्यकारी संचालक पे किम्बली,सुमित अगरवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
यंदा स्पर्धेचा विषय 'एव्हरी चाईल्ड इज युनिक अॅन्ड सो ईज एव्हरी वर्ड'असा होता. ही संपूर्ण स्पर्धा भारतात आयोजित करण्यात आली होती. तर इंग्रजीतील स्पेलिंग येणाऱ्या अशा 30 शहरांतील एक हजाराहून अधिक शाळेंमधील 3 लाख विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. प्रत्येक शाळेतील पहिल्या 15 स्पेलर्सची निवड ही ऑनलाईन पद्धतीने शहर अंतिम फेरीसाठी करण्यात आली. शहर अंतिम फेरीतील विजेत्यांची निवड ही स्पर्धेच्या सेमी फायनलसाठी करण्यात आली. यात संपूर्ण भारतातून आलेल्या पहिल्या 16 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून, या स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.