मुंबईत पावसाळ्याच्या तोंडावर डेंग्यू, मलेरिया आदी साथीचे रोग पसरू नयेत म्हणून मुंबई महापालिकेकडून डासांची ठिकाणे शोधून ती नष्ट केली जातात. मुंबई महापालिकेचा कीटकनाशक विभाग ही मोहीम नियमितपणे राबवत असतो. जानेवारी ते जून महिन्यापर्यंत राबवलेल्या मोहिमेत १ लाख २८ हजार २२० वस्तू हटवून मलेरिया व डेंग्यूचा संभाव्य धोका कमी केला होता.
पालिकेने विविध ठिकाणच्या विहिरी, पाण्याच्या टाक्या, तरण तलाव अशी एकूण १ लाख ७२ हजार ५७२ ठिकाणे तपासली. यामधील मलेरिया पसरवणारी ४ हजार ६०१ ठिकाणे नष्ट करण्यात आली. डेंग्यूच्या संभाव्य अळ्या सापडणारी पाण्याची पिंपे, टायर, ऑड आर्टिकल, पेट्री लेट्स आणि मनी प्लांटची झाडे अशी एकूण ५३ लाख ९२ हजार ७५४ ठिकाणांची तपासणी करण्यात आली. त्यात १५ हजार ५९३ डेंग्यूच्या अळ्यांची ठिकाणे सापडली. ती नष्ट करण्यात आली आहेत.
अनेक गगनचुंबी इमारतींमध्ये डेंग्यूच्या अळ्या सापडल्या आहेत. अनेक झोपडपट्टय़ांमध्ये पाण्याची पिंप भरून ठेवलेली आहेत. लोक गावी गेल्यामुळे या पिंपांमध्ये डेंग्यूच्या अळ्या मोठ्या प्रमाणात सापडल्या आहेत. पावसाळ्यात छपरावरील प्लास्टिक/टारपोलिनवर पाणी साचते. तिथे तसेच आवारात, गच्चीवर किंवा आजूबाजूच्या परिसरात पाणी साचून राहिल्यामुळे डेंग्यू, मलेरियाचा प्रसार होऊ शकतो. त्या पाश्वभूमीवर, घरात आणि घराबाहेरील भांडय़ाकुंडय़ांमध्ये पाणी साचणार नाही, याची काळजी घ्या, असे आवाहन किटक नाशक विभागातील अधिकाऱ्यांनी केलं आहे.