Advertisement

१४ वर्षाच्या मुलीच्या पोटात १७ किलोचा ट्यूमर, कामा रुग्णालयातील डाॅक्टरांची यशस्वी शस्त्रक्रिया


१४ वर्षाच्या मुलीच्या पोटात १७ किलोचा ट्यूमर, कामा रुग्णालयातील डाॅक्टरांची यशस्वी शस्त्रक्रिया
SHARES

उत्तर प्रदेशातल्या एका १४ वर्षांच्या मुलीचं पोट अचानक फुगू लागलं. का? कशामुळे? कुणाला काहीच कळत नव्हतं. बरं, तिला कोणत्याही वेदना होत नव्हत्या. पण शरीराच्या अात नक्की काहीतरी घडतंय, यामुळे तिच्या कुटुंबियांची घालमेल सुरू होती. अखेर वडिलांनी लखनौमध्ये जाऊन तिच्यावर उपचार करवून घेतले. मात्र डाॅक्टरांनाही अचूक निदान करता येत नव्हतं. अखेर तिच्या वडिलांनी थेट मुंबई गाठण्याचा निर्णय घेतला. स्वप्नांची नगरी असलेल्या मुंबईत सर्वांच्या इच्छा पूर्ण होतात, असं म्हटलं जातं. सलमानी कुटुंबियांच्या बाबतीतही सुदैवानं तसंच घडलं. १४ वर्षांच्या सबेरा हिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करून कामा रुग्णालयातील डाॅक्टरांनी तिच्या पोटातून तब्बल १७ किलो वजनाचा सबेरा हिला जीवदानंच दिलं अाहे. 


कामा रुग्णालयामध्ये झाले यशस्वी उपचार

सबेरा गेल्या महिन्यात कामा रुग्णालयात दाखल झाली. अनेक चाचण्या केल्यानंतर तिच्या गर्भाशयात भलामोठा ट्यूमर असल्याचं निदान डाॅक्टरांनी केलं. पण ट्यूमरचा अाकार इतका मोठा होता की, डाॅक्टरांसमोरही शस्त्रक्रिया करण्याचं नवं अाव्हान उभं ठाकलं होतं. मात्र कामा रुग्णालयातील डाॅक्टरांनी हे अाव्हान यशस्वीपणे पेललं अाणि १७ किलोचा ट्यूमर सबेराच्या पोटातून बाहेर काढून तिला एकप्रकारे जीवदानच दिलं अाहे. ट्यूमरसोबत तिच्या गर्भाशयातून १० लीटर फ्ल्यूडही काढण्यात अालं अाहे. 


सबेरा जेव्हा कामा रुग्णालयात दाखल झाली, तेव्हा तिचं पोट खूप वाढलं होतं. सुरुवातीला तिला जास्त त्रास होत नव्हता. त्यामुळे आम्ही आधी तिच्या बऱ्याच चाचण्या केल्या. तिला म्युसिनस सिस्टाडेनोमा ट्यूमर झाल्याचं निदान समोर अालं. त्यामुळे आम्ही खरंच तिच्या पोटातून एवढा मोठा ट्यूमर काढला आहे, यावर विश्वासच बसत नाहीये.

- डॉ. राजश्री कटके, वैद्यकीय अधीक्षक, कामा रुग्णालय

सबेराचे वडील रईस अहमद हे नालासोपारा येथे राहत असून रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करतात. पण दिवाळीत ते जेव्हा गावी गेले, तेव्हा सबेराचं वाढलेलं पोट पाहून त्यांना धक्काच बसला. 'सबेराच्या गर्भाशयामध्ये एवढा मोठा ट्यूमर आहे, याबद्दल आम्हाला माहिती नव्हती', अशी प्रतिक्रिया रईस अहमद यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली.


मी दिवाळीत गावी गेलो होतो. तेव्हा कळलं की तिचं पोट फुगलं आहे. पण, ती एवढी लहान आहे, की आम्हाला काय करावं हेच कळत नव्हतं. मी लखनौसह बऱ्याच ठिकाणच्या रुग्णालयात तिच्यावर उपचार केले. पण, काही फरक पडत नव्हता. शेवटी तिला मुंबईत आणलं. या रुग्णालयातील डॉक्टरांनी तिच्यावर तात्काळ उपचार करत तिला जीवदान दिलं.

- रईस अहमद, सबेराचे वडील



हेही वाचा

गर्भाशयातून निघाल्या ६५ गाठी, कामा रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा