मागील काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. राज्यानं कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेवर पूर्णपणे नियंत्रण मिळवलं आहे. सध्या मुंबईत २२५५ सक्रिय रुग्ण असून यातील केवळ ५०० रुग्ण मुंबईतील विविध कोविड रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रातील तब्बल २९५०० बेड रिकामे असल्याची माहिती समोर आली आहे.
तर सक्रिय रुग्णांपैकी निम्म्याहून अधिक रुग्णांना कोविड विषाणूची सौम्य लक्षणं असल्यानं त्यांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. मुंबईत कोरोना स्थिती सध्या चांगलीच आटोक्यात आली असल्यानं हजारो बेड रिक्त राहत असल्याचं पालिका प्रशासनाकडून नुकतच सांगण्यात आलं आहे.
सद्यस्थितीत बेड रिकामे असले तरी कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन पालिका सज्ज असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत बिकट परिस्थिती झालेल्या मुंबई शहरात सध्या कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचा दर ९७ टक्क्यांवर पोहोचला आहे.
नव्यानं आढळणाऱ्या रुग्णांचा दर ०.०४ टक्क्यांवर गेला आहे. असं असलं तरी प्रशासनानं तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर दहिसर, मालाड, गोरेगाव नेस्को, बीकेसी कुर्ला, एनएससीआय वरळी, मुलुंड अशी सहा जम्बो कोविड सेंटर सज्ज ठेवली आहेत. याशिवाय महालक्ष्मी रेसकोर्स, कांजूरमार्ग, सोमय्या मैदान या ठिकाणीही जम्बो कोविड सेंटर उभारण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.