Advertisement

मीरा-भाईंदरमध्ये ८४ टक्के कोरोना रुग्ण बरे

मीरा-भाईंदर शहरात कोरोना रुग्णांची एकूण संख्या १४१५२ झाली आहे. तर आतापर्यंत ४४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मीरा-भाईंदरमध्ये ८४ टक्के कोरोना रुग्ण बरे
SHARES

मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या रोज वाढतच आहे. रोज सरासरी या ठिकाणी १५० च्या आसपास रुग्ण आढळत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, येथील रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही अधिक आहे. आतापर्यंत एकूण रुग्णांपैकी  ८४ टक्के रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. 

मीरा-भाईंदर शहरात कोरोना रुग्णांची एकूण संख्या १४१५२ झाली आहे. तर आतापर्यंत ४४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण संख्या आटोक्यात आणणे आणि रुग्ण कोरोनामुक्त करण्याचे आव्हान पालिकेसमोर आहे.  रुग्ण कोरोनामुक्त करण्यास पालिकेला यश आलं आहे. आतापर्यंत तब्बल ११ हजार ९१८ रुग्ण बरे झाले आहेत. 

 संशयित रुग्णांना शोधण्यासाठी व मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी मीरा-भाईंदर महापालिकेने पुन्हा ‘चेस द व्हायरस’  सर्वेक्षण मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम पुढील पाच दिवस राबवली जाणार आहे. या मोहिमेत सर्दी, खोकला व ताप असलेल्या रुग्णांचा शोध घेऊन तपासणी केली जाणार आहे. त्याचप्रमाणे बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची कोरोना चाचणी केली जाणार आहे.

दरम्यान, पाच महिन्यांच्या प्रदीर्घ काळानंतर सोमवारपासून मीरा-भाईंदर शहरातील मॉल्स उघडे करण्याची परवानगी पालिका आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी दिली आहे. त्यामुळे मॉल्समधील व्यापारी आणि कर्मचारी वर्गाने समाधान व्यक्त केले. मीरा-भाईंदर पालिका प्रशासनाने मॉलवरील निर्बंध उठविले असले तरी सामाजिक अंतराचे व इतर नियमांचे व्यवस्थापनाने पालन न केल्यास मॉल पुन्हा बंद करण्याचा इशारा दिला आहे.



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा