एका हातात छत्री, दुसऱ्या हातात रुमाल आणि तोंडाला स्कार्फ... अशा विचित्र अवस्थेत सध्या मुंबईकर घराबाहेर पडत आहेत. मुंबईचा पाराच एवढा वाढलाय की, नाईलाजानं मुंबईकरांना पाऊस नसूनही छत्री उघडून चालावं लागत आहे. पावसाच्या पाण्याऐवजी मुंबईकर घामाच्या धारांनी ओलेचिंब होत आहेत.
पुढील दोन दिवस मुंबईकरांना याचप्रकारे उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं आहे. २९ आॅगस्टला झालेल्या मुसळधार पावसानंतर हळुहळू पावसाचं प्रमाण कमी झालं. त्यानंतर तापमानात एक ते दीड अंशाची वाढ झाली. हवेतील आर्द्रताही ६ टक्क्यांनी वाढल्याचं कुलाबा वेधशाळेने सांगितलं आहे.
या वाढत्या उन्हामुळं आजारही वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं मुंबईकरांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असं आवाहन डॉक्टरांनी केलं आहे.
तुम्ही सतत फिरतीवर असाल, तर शरीरात पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन) होऊ शकते. त्याशिवाय, उलट्या, जुलाब, व्हायरल इंन्फेक्शन, श्वसनाचे विकार, अति उन्हामुळे हिट स्ट्रोक होऊ शकते. त्यामुळे मुंबईकरांनी सोबत पाणी ठेवले पाहिजे. बाहेरचे थंड पेय टाळावेत.
- डॉ. सागर कजबजे, कन्सल्टंट फिजीशियन
वाढत्या उन्हाचा त्रास तुमच्या त्वचेला होऊ शकतो. त्वचा काळी पडू शकते. जास्त घाम आल्यास फंगस इन्फेक्शन होऊन शरीरावर लाल चट्टे उठू शकतात किंवा नायटा होऊ शकतो. त्यामुळे उन्हात जास्त घट्ट कपडे टाळले पाहिजे. शिवाय, उन्हात भरपूर पाणी प्यावे, जेणेकरुन त्वचा चांगली राहील.
- डॉ. उदय खोपकर, त्वचाविकारतज्ज्ञ, केईएम रुग्णालय
मान्सूनच्या आगमनाच्या काळात समुद्रातून उत्तरेच्या दिशेने भूभागाकडे वारे वाहत होते. पण, आता मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे उत्तरेकडून एका भूभागाकडून दुसऱ्या भूभागाकडे वारे वाहत आहेत. त्यामुळे हवेतील आर्द्रतेचे प्रमाण अपेक्षेपेक्षा वाढले आहे. ७८-८० च्या घरात असलेली आर्द्रता ८७ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.
हेही वाचा -
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)