कोरोनाविरुद्ध लस (Corona vaccine) हे सर्वात प्रभावी शस्त्र आहे. मुंबईतील (Mumbai) २.९ लाख कोरोना रूग्णांच्या सर्वेक्षणात हे स्पष्ट देखील झालं आहे. मुंबई पालिकेनं (BMC) १ जानेवारी ते १७ जून या कालावधीत २ लाख ९० हजार कोरोना रुग्णांचं सर्वेक्षण केलं.
मुंबईत काही लोकांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला नाही. मात्र कोरोना लसीचा पहिला डोसही अधिक चांगलं काम करत असल्याचं सर्वेक्षणातून समोर आलं आहे.
२.९ लाख लोकांपैकी केवळ २६ जण कोरोनाचे दोन्ही डोस घेतल्यानंतर पॉझिटिव्ह आढळले, अशी माहिती सर्वेक्षणातून समोर आली आहे. त्याचबरोबर पहिल्या डोसनंतर १० हजार ५०० जणांना कोरोनाची लागण झाली. पालिकेच्या आकडेवारीनुसार, १ जानेवारी २०२१ ते १७ जून २०२१ या काळात मुंबईत सुमारे ४० लाख ७५ हजार ३९३ लोकांनी लस घेतली. यापैकी केवळ ०.२३% लोकांना कोरोना संसर्ग झाल्याचं आढळून आलं आहे.
मुंबई पालिकेच्या वॉर रूमनं गोळा केलेल्या आकडेवारीनुसार, दुसर्या लाटेत मुंबईत ३.९५ लाख नवीन रुग्ण आढळले. यापैकी वॉर रूमनं २.९ लाख रुग्णांशी संपर्क साधून त्यांचं सर्वेक्षण केलं. त्यापैकी बहुतेक रुग्ण होम आयसोलेशन असलेले रुग्ण होते.
ताज्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत ५३.८३ लाख लोकांनी लस घेतली आहे. त्यापैकी १० लाख लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.
हेही वाचा