Advertisement

कोरोना लसीची निर्मिती मुंबईत 'इथं' होणार

यासाठी १५४ कोटी रुपये खर्चाचा नवीन प्लांट मुंबईत सुरू करण्यात येणार आहे.

कोरोना लसीची निर्मिती मुंबईत 'इथं' होणार
SHARES

पुण्यापाठोपाठ आता मुंबईतही कोरोना लशीची (Corona vaccine in mumbai) निर्मिती होणार आहे. मुंबईतील हाफकिन (Haffkine) बायोफार्मा कॉर्पोरेशन कोरोना लशीचं उत्पादन करणार आहेत. हैदराबाद इथली भारत बायोटेक यांच्या संयुक्त विद्यमानं मुंबईत कोविड लशीचं उत्पादन घेतलं जाणार आहे.

यासाठी १५४ कोटी रुपये खर्चाचा नवीन प्लांट मुंबईत सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिली.

कोविड लशीच्या उत्पादनासाठी लस संशोधनाचा वारसा असणाऱ्या हाफकिन संस्थेनं पुढे यावं असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलिकडे केलं होतं. दरम्यान आता हाफकिनमध्ये लस तयार होणार आहे.

हाफकिनमार्फत सुरू करण्यात येणाऱ्या लशीचं उत्पादन दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात भारत बायोटेक यांच्याकडील लस घेण्यात येणार आहे. ती लस हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशनमार्फत रिपॅकिंग आणि फिलिंग करून आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देण्यात येईल.

सध्या या लशीचे उत्पादन भारत बायोटेक आणि इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्यामार्फत संयुक्तपणे केले जाते. कोवॅक्सिन या नावानं ही लस सध्या बाजारात आणली आहे. यापैकी इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ही संस्था केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाच्या अधिनस्त कार्यरत आहे.

हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशनला ही लस लवकर मिळाल्यास येत्या एप्रिल किंवा मेपासून लस उपलब्ध केली जाईल. तर स्वतंत्रपणे कोरोना लशीचे उत्पादन करण्यासाठी हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशनला एक ते दीड वर्षाचा कालावधी लागेल.

हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशनमार्फत कोविड लशीची गरज असेल तोपर्यंत हे उत्पादन सुरू ठेवण्यात येईल. त्यानंतर या प्लांटमधून श्वान दंशावरील लस विकसित करून या लशीचे उत्पादन घेण्यात येईल.



हेही वाचा

विकेंडला जुहू बीच बंद करावा, भाजपा आमदाराची मागणी

चेंबूर, वांद्र्यातील कोरोनाची आकडेवारी सप्टेंबर-ऑक्टोबरपेक्षा खराब

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा