महाराष्ट्रातील कोरोना हॉटस्पॉटची (corona hotspot reduce in maharashtra) संख्या १४ वरून ५ वर आणण्यात यश मिळाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. कोरोनाशी लढताना आरोग्य यंत्रणा अहोरात्र झटत आहे. चाचण्या (coronavirus test) केल्या जात आहेत, सर्वेक्षण होत आहे. रुग्ण/संशयितांना आयसोलेशन आणि क्वारंटाईन केलं जात आहे. याच जोरावर राज्यात कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग मंदावला असून हा कालावधी ७ दिवसांवर गेला आहे, असं टोपे म्हणाले. आरोग्यमंत्र्यांनी फेसबुक लाइव्हद्वारे संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
‘या’ क्षेत्रांवर विशेष लक्ष
सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना आरोग्यमंत्री राजेश टोपे (health minister rajesh tope) म्हणाले, जागतिक आरोग्य संघटना, आयसीएमआर यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य शासनामार्फत कोरोना प्रतिबंध आणि उपचार केले जात आहेत. त्यामुळे राज्यात घाबरून जाण्याची स्थिती नाही. महाराष्ट्रात सुरूवातीला कोरोनासाठी १४ हॉटस्पॉट (corona hotspot) होते. आता तेथे रुग्ण संख्या नाही. त्यामुळे त्याची संख्या कमी करत ५ वर आली आहे. मुंबई महानगर परिसर, पुणे परिसर, नागपूर, नाशिक, असे हॉटस्पॉट असून मालेगाववर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
हेही वाचा - क्वारंटाईन रुग्णांसाठी बेड 2 हजारांपर्यंत वाढवा, पाहणीनंतर केंद्रीय पथकाची शिफारस
रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी मंदावला
महाराष्ट्रात दररोज सुमारे ७ हजार कोरोना चाचण्या केल्या जातात. बुधवारी ७११२ चाचण्या करण्यात आल्या. कोरोनाचे रुग्ण (covid-19 patient) दुप्पट होण्याचा कालावधी आधी ३.१, त्यानंतर ५ आणि आता ७.१ दिवसांवर गेला आहे. हा ७ दिवसांचा कालावधी अजून वाढविण्याचा उद्देश आहे.
राज्यात दररोज १३ टक्के लोक बरे होऊन घरी जात आहेत. हे आशादायी चित्र आहे. केवळ एक टक्के रुग्ण अत्यवस्थ आहेत. ८३ टक्के लोकांना लक्षणे नाही, तर १७ टक्के लोकांना सौम्य स्वरूपाची लक्षणे आहेत. कोरोनामुळे होणारा राज्याचा मृत्यूदर देखील ७ वरून सरासरी ५ वर आला आहे. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा अभ्यास करण्यासाठी २ समित्या नेमल्या आहेत, अशी माहिती देखील टोपे यांनी दिली.
आरोग्य यंत्रणांचं अहोरात्र काम
कोरोनाशी लढताना आरोग्य यंत्रणा अहोरात्र झटत आहे. चाचण्या केल्या जात आहेत, सर्वेक्षण होत आहे. आयसोलेशन आणि क्वारंटाईन केलं जात आहे. जर समजा कुठलीच उपाययोजना केली नाही, तर काय होईल यासाठी गणितीय गृहितकावर आधारित रुग्णसंख्येची माहिती समाजमाध्यमांवर फिरत आहे. मात्र महाराष्ट्रात ज्या पद्धतीने कार्यवाही होत आहे. रुग्ण दुपटीचा दर सात दिवसांवर गेलाय त्यामुळे राज्यातील चित्र आशादायी आहे. लोकांनी घाबरू नये, असा दिलासाही आरोग्यमंत्र्यांनी दिला.