आशियातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या हळूहळू कमी होताना दिसून येत आहेत. बुधवारी धारावी परिसरात केवळ ३ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यामुळे प्रशासनाला थोडंफार हायसं वाटू लागलेलं आहे.
धारावी झोपडपट्टीत अवघ्या २.५ किमी क्षेत्रफळात ६.५ लाखांहून जास्त लोकसंख्या अत्यंत दाटीवाटीने राहते. एकमेकांना खेटून असलेल्या झोपड्यांमध्ये ८ ते १० लोकं राहतात, सार्वजनिक स्वच्छतागृहांमुळे इथं सोशल डिस्टन्सिंग पाळणं निव्वळ अशक्य आहे. २ महिन्यांपूर्वी कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे धारावी हा कोरोनाचा हाॅटस्पाॅट बनली होती. दिवसागणिक मोठमोठे आकडे हाती येत असल्याने सर्वजण चिंताग्रस्त झाले होते. परंतु मुंबई महापालिका प्रशासनाने धारावीसाठी विशेष योजना राबवत कोरोनाबाधितांचा स्तर घटवण्याला प्राधान्य दिलं. महापालिका कर्मचारी, आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिवस-रात्र केलेल्या मेहनतीमुळेच धारावीतील कोरोनाबाधितांची संख्या घटताना दिसत आहे.
हेही वाचा - अरे व्वा! धारावीत दिवसभरात सापडला फक्त एक कोरोना रुग्ण
धारावीत बुधवारी केवळ ३ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर मंगळवारी अवघा १ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला होता. मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार धारावीतील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढून २,३३८ एवढी झाली आहे.
मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, धारावीमध्ये सद्यस्थितीत केवळ ३२९ अॅक्टिव्ह केस आहेत. मागील काही दिवसांपासून मुंबई महापालिकेने धारावीतील कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचा आकडा देण्याचं थांबवलेलं आहे. त्यामुळे नेमका आकडा सांगणं कठीण आहे. धारावीत १ एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. म्हणजेच मुंबईत पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याच्या २० दिवसानंतर धारावीत कोरोना संक्रमणाला सुरूवात झाली होती.
त्यानंतर धारावीत कोरोनाचं संक्रमण झाल्यास कोरोनाबाधित रुग्णांचा विस्फोट होईल, असं भाकीत वर्तवण्यात येत होतं. परंतु महापालिकेने राबवलेल्या विशेष उपाययोजनांमुळे येथील रुग्णसंग्या हळुहळू कमी होऊ लागली आहे.