१५ जुलैपासून पुढील ७५ दिवस १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा बूस्टर डोस मोफत मिळणार आहे. मोफत बूस्टर डोस २७ सप्टेंबरपर्यंत दिला जाऊ शकतो. शासकीय रुग्णालयावर हा बुस्टर डोस उपलब्ध असणार आहे. सध्या देशात १९९ कोटी लसीचे डोस लागू करण्यात आलेले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.
काही दिवसांपूर्वी सरकारने बूस्टर डोस घेण्याचा कालावधी देखील कमी केला आहे. पहिले दोन डोस घेतल्यानंतर 9 महिन्यांनंतरच एखाद्याला बूस्टर मिळू शकत असे. परंतू तो कालावधी आता 6 महिन्यांवर आणला आहे.
सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त अमृत महोत्सवाचा भाग म्हणून कोविडचा प्रतिबंधात्मक डोस वाढवण्यासाठी मोहीम राबविण्यात येणार आहे.
आतापर्यंत, 18-59 वयोगटातील 77 कोटी लोकसंख्येच्या 1% पेक्षा कमी लोकांना प्रिकॉशन डोस मिळाला आहे. 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या 16 कोटी लोकसंख्येसह केवळ 26% आरोग्य सेवा आणि फ्रंटलाइन कामगारांना बूस्टर डोस मिळाला आहे.
ICMR सह अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांच्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, कोरोना लसीचे दोन्ही डोस दिल्यानंतर शरीरातील अँटीबॉडीजची पातळी सुमारे 6 महिन्यांनी कमी होते. जेव्हा बूस्टर डोस दिला जातो तेव्हा रोगप्रतिकारक प्रतिक्रिया वाढते. यासाठी सरकार 75 दिवसांसाठी विशेष मोहीम सुरू करणार आहे.
यापूर्वी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या आठवड्यात लसीचा दुसरा आणि प्रिकॉशन डोस 9 महिन्यांवरून 6 महिन्यांपर्यंत कमी केला होता.
'हर घर दस्तक अभियान 2.0' 1 जून रोजी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लसीकरणाला गती देण्यासाठी आणि बूस्टर डोसला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आले. दोन महिन्यांचा हा उपक्रम आता सुरू आहे.
हेही वाचा