कच्च्या मालाच्या वाढलेल्या किंमतींचा परिणाम हा मिठाई आणि फराळावरदेखील झाला आहे. जीएसटीमुळे काही प्रमाणात सगळ्याच मिठाईच्या किंमती वाढल्या आहेत. असं असताना स्वस्त मिठाईकडे ग्राहकांचा कल वाढणं सहाजिकच आहे. मात्र अशी स्वस्तातली मिठाई घेताना सावधान! कारण स्वस्तातली मिठाई पडू शकते महागात!
मिठाई स्वस्तात विकण्याच्या नादात मिठाईवाले चक्क ग्राहकांच्या जीवाशी खेळत असून किंमत कमी करण्यासाठी ते वेगवेगळ्या युक्त्या लढवताना दिसत आहेत.
काजूकतली, मोतीचूरचे लाडू अशा विविध मिठायांना आकर्षक बनवण्याचं काम त्यावरील चांदीचा वर्ख करतो. मात्र, सध्या या वर्खांची किंमत ही गगनाला भिडली आहे. म्हणूनच कित्येक छोटे व्यापारी चांदीच्या जागी अलिमुनियमी, कॅडमियम आणि क्रोमियम या धातूंपासून बनवलेले वर्ख वापरत असल्याचं समोर आलं आहे.
१००० चांदीच्या वारखासाठी जिथे ६५०० ते ७५०० रुपये मोजावे लागतात तिथेच अॅल्युमिनियम, कॅडमियम आणि क्रोमियम धातूंचा वर्ख हा अर्ध्या किंमतीत म्हणजे २५०० हजार रुपयांना मिळतो. असा वर्ख वापरल्याने मिठाईची किंमत १५ ते २० टक्क्याने कमी होऊ शकते.
अॅल्युमिनियम, कॅडमियम आणि क्रोमियम धातूंचा हा वर्ख जेवढा स्वस्त आहे, तेवढाच तो जिवाला धोकादायक देखील आहे. हा वर्ख शरीरात गेल्याने पोटाचे विकार तसेच कॅन्सर देखील होण्याचा धोका आहे.
'इतर धातूंपासून बनलेल्या वर्खाला चांदीपेक्षा जास्त चमक असते. त्याच बरोबर चांदीचा वर्ख हातात घेतल्यास तो हाताला चिकटतो आणि त्याचा गोळा तयार होतो. इतर धातूंपासून बनलेला वर्ख हातात घेतल्यास त्याचे तुकडे पडतात' अशी माहिती दहिसर येथील मुरलीधर स्वीट्सचे मालक कुलीन पटेल यांनी 'मुंबई लाईव्ह'शी बोलताना दिली.
आमचं दुकान हे अतिशय प्रतिष्ठित असून आमच्या मिठाईत आम्ही सगळं चांगलंच साहित्य वापरतो. मात्र, छोटे दुकानदार जास्त नफा कमवण्याच्या नादात नागरिकांच्या जिवाशी खेळत असल्याची शक्यता मात्र नाकारता येत नाही.
कुलीन पटेल, मालक, मुरलीधर स्वीट्स
हेही वाचा