राज्यात म्युकरमायकोसिसच्या (Mucormycosis) रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र, या सर्व रुग्णांवर उपयार सुरू आहेत. या रुग्णांवर मोफत उपचार (Free treatment on mucormycosis) देण्याच्या संदर्भातही आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. अखेर या रुग्णांवर मोफत उपचार होणार आहेत.
राज्यात म्युकरमायकोसिस आजाराची तीव्रता वाढत असून त्यासाठी बहुआयामी विशेषज्ञ सेवांची गरज भासत आहे. त्यासाठी लागणारा खर्च जास्त असून सामान्य रुग्णांवर त्याचा भार पडू नये यासाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत राज्यातील सर्व पात्र नागरिकांवर अंगीकृत रुग्णालयांमध्ये म्युकरमायकोसिस आजारावर उपचार करण्यात येणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
म्युकरमायकोसिसचे राज्यात साधारणत: ८०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. म्युकरमायकोसिसचे ५०० रुग्ण बरे झाले आहेत. म्युकरमायकोसिससाठी लागणाऱ्या इंजेक्शनची कमतरता आहे. आपण १ लाख ९० हजार इंजेक्शन ऑर्डर दिल्या आहेत.
पण केंद्र सरकारनं यावर संपूर्ण ताबा घेतला आहे, असं राजेश टोपे म्हणाले. त्यामुळे इंजेक्शनचा अधिकार राज्यांना द्या. म्युकरमायकोसिसचे इंजेक्शन महाराष्ट्राला द्या. राज्याला म्युकरमायकोसिसच्या दीड ते दोन लाख इंजेक्शनची आवश्यकता आहे. केंद्र सरकारसोबत सातत्यानं संपर्कात आहोत आणि पंतप्रधान मोदींकडे विषय मांडणार आहोत असंही आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
राज्यात कोरोना रुग्णवाढीचा दर घसरला आहे. रुग्णवाढीच्या दरात महाराष्ट्र ३४व्या क्रमांकावर आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.६९ टक्के इतके झाले आहे. राज्यात ४ लाख १९ हजार ७२७ सक्रिय रुग्ण आहेत. सध्या फक्त दुसऱ्या डोसचं लसीकरण सुरू असल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा