Advertisement

कोरोना वगळता इतर आजारांसाठीही मुंबईत ७,५०० खाटा

मुंबईभर असलेल्या एकूण १८७ डिस्पेन्सरी म्हणजे महानगरपालिकेचे दवाखाने आणि १ हजार ४१६ खासगी नर्सिंग होम कोरोना वगळता इतर उपचारांसाठी उपलब्ध आहेत.

कोरोना वगळता इतर आजारांसाठीही मुंबईत ७,५०० खाटा
SHARES

महानगरपालिका क्षेत्रातील मुख्‍य रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये, प्रसुतिगृहे, दवाखाने यांच्यासह खासगी नर्सिंग होममध्ये कोरोना आजाराव्यतिरिक्त इतर आजारांसाठी उपचार घेता यावेत, म्हणून सुमारे ७ हजार ५०० पेक्षा अधिक खाटांसह आवश्यक त्या सर्व उपचार सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.  कोरोना बाधितांसाठी मुंबई महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा शक्य त्या सर्व सेवा-सुविधा पुरवत असताना इतर आजारांशी संबंधित रुग्णांसाठी देखील आरोग्य सेवेमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही, याकडं प्रकर्षाने लक्ष देत आहे.

पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांपैकी शीव (सायन) येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका रुग्णालयामध्ये १ हजार २७८, परळच्या केईएम रुग्णालयामध्ये १ हजार ७११ आणि जुहू-विलेपार्लेच्या डॉ. कूपर रुग्णालयामध्ये ५५० अशा एकूण ३ हजार ५३९ खाटा कोरोना वगळता इतर आजारांवर वैद्यकीय उपचार आवश्यक असलेल्या रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. महानगरपालिकेच्या १७ उपनगरीय रुग्णालयांमध्ये ३ हजार ७६ खाटा नॉन कोविड आहेत. २७ मॅटर्निटी होम म्हणजे प्रसुतिगृह मिळून ८९९ खाटा आहेत. या सर्व खाटांची एकूण संख्या ७ हजार ५१४ आहे. 

मुंबईभर असलेल्या एकूण १८७ डिस्पेन्सरी म्हणजे महानगरपालिकेचे दवाखाने आणि १ हजार ४१६ खासगी नर्सिंग होम कोरोना वगळता इतर उपचारांसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी इतर आजारांवरील उपचार, सेवा-सुविधांबाबत चिंता करु नये, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

कोरोना वगळता इतर विविध आजारांबाबत उपचारांची सुविधा असलेली महानगरपालिकेची प्रमुख रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये, प्रसुतिगृह, दवाखाने तसेच खासगी नर्सिंग होम इत्यादींचे विभागनिहाय नांव, पत्ता, संपर्क क्रमांक यांची यादी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर जनतेच्या माहितीसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच याबाबत अधिक माहितीसाठी महानगरपालिकेचा हेल्पलाईन क्रमांक १९१६ वर देखील संपर्क साधता येईल. कोविड आजाराव्यतिरिक्त आवश्यक उपचारांसाठी नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असं आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केलं आहे.



हेही वाचा -

महाराष्ट्रात ३१ मे पर्यंत लाॅकडाऊन? पण केंद्रानंतरच घोषणेची शक्यता

पोलिसांवर हल्ल्याच्या 218 गुन्हे, तर 770 जणांना अटक




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा