ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे राज्यात अनेक कोरोना रुग्ण दम तोडत आहेत. त्यामुळे साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी ५००-६०० रुग्णांना पुरेल एवढ्या क्षमतेचा ऑक्सिजन प्लँट निर्मितीचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाला रिलायन्स समुहाची देखील साथ मिळाली आहे.
सुरुवातीला फक्त साईसंस्थाननं ऑक्सिजन प्लांट उभारणीचा निर्णय घेतला होता. पण त्यासाठी न्यायालयाची परवानगी घेणं आवश्यक होतं. त्यात बराच वेळ गेला असता. पण रिलायन्सनं मदतीचा हात दिल्यानं याला अधिक वेळ लागणार नाही.
सद्य:स्थिती पाहता येत्या दहा-बारा दिवसांत रिलायन्स समूह संस्थानच्या साईबाबा सुपरस्पेशालिटी रुग्णालयात सुमारे ३ कोटी खर्चाचा ऑक्सिजन प्लँट सुरू करणार आहेत. त्यासोबतच १ कोटी खर्च असलेली आरटीपीसीआर तपासणीची अद्ययावत लॅबची निर्मिती देखील करणार आहेत.
साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रिलायन्स समूह आमच्या मदतीला धावून आला आहे. समुहाचे आनंद अंबानी यांनी आमच्याशी संपर्क साधला. त्यांच्या मदतीनं पुढील १० दिवसात ऑक्सिजननिर्मिती प्लांट सुरू होईल. शिवाय एम्सच्या मदतीनं RTPCR चाचणी प्रयोगशाळा सुरू करू.
ऑक्सिजनचा तुटवडा असल्यानं संस्थाननं हा प्लँट, आरटीपीसीआर लॅबच्या निर्मितीचा प्रस्ताव दिला. अंबानी परिवारानं पुढाकार घेतल्यानंतर रिलायन्स समन्वयक गिरीश वशी संस्थानच्या संपर्कात असून प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी काम पाहत आहेत.
अंबानी कुटुंबीय साईभक्त असून नीता आणि त्यांचा मुलगा अनंत नियमितपणे शिर्डीत साई दर्शनाला येतात. प्रत्येक वेळी साई संस्थानला विविध स्वरूपात देणग्या रिलायन्स समूहाकडून देण्यात आल्या आहेत. आता कोरोनाच्या संकटात हे कुटुंब संस्थानच्या मदतकार्यात धाऊन आलं आहे.
हेही वाचा