मुंबईतील महापालिकेच्या रुग्णालयात आता टीबीवर शस्त्रक्रिया करणं अधिक सोपं होणार आहे. कारण, मुंबईतील शिवडी टीबी रुग्णालयात टीबीवर थोरॅकोस्कोपिक सर्जरी करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे जर टीबी रुग्ण औषधं घेऊन बरा होत नसेल आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया करणं गरजेचं असेल, तर ही शस्त्रक्रिया रुग्णाला अधिक फायदेशीर होऊ शकेल.
काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेच्या शिवडी टीबी रुग्णालयात 80 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच टीबीसाठीची 'व्हीडिओ असिस्टेड थोरॅकोस्कोपिक (VAT)शस्त्रक्रिया' करण्यात आली.
उत्तरप्रदेशहून आलेला एक 22 वर्षीय मुलगा टीबीचे उपचार घेण्यासाठी म्हणून शिवडी टीबी रुग्णालयात दाखल झाला. त्याच्यावर करण्यात आलेली थोरॅकोस्कॉपिक शस्त्रक्रिया महापालिकेच्या शिवडी टीबी रुग्णालयासाठी ऐतिहासिक घटना ठरली आहे.
शिवडी टीबी हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच व्हिडिओ असिस्टेड थोरॅकोस्कोपिक सर्जरी करण्यात आली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर त्या मुलाला फक्त 3 दिवसांमध्ये रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आणि आता त्याच्या प्रकृतीत बऱ्याच सुधारणा झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
शिवडी रुग्णालयाच्या इतिहासातील ही एक महत्त्वाची शस्त्रक्रिया आहे. त्यामुळे मला खूप गर्व वाटतो महापालिकेचा आणि शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांचा. या शस्त्रक्रियेमुळे मला अत्यंत आनंद झाला आहे. किमान 20 - 30% टीबीच्या रुग्णांना याचा फायदा होणार आहे.डॉ. ललितकुमार आनंदे, मुख्य आरोग्य अधिकारी, शिवडी टीबी हॉस्पिटल
छातीत 1 ते दिड सेंटिमीटर लांबीची 3 छिद्र पाडली जातात. एकातून दुर्बिण आणि दुसऱ्या दोन छिद्रातून साधनं टाकली जातात. त्यानंतर मॉनिटरवर बघून ही शस्त्रक्रिया केली जाते. यामुळे ही शस्त्रक्रिया रुग्णासाठी कमी त्रासदायक ठरते. लंग कॅन्सरसाठी प्राधान्याने ही शस्त्रक्रिया केली जाते. पण, लंग कॅन्सरसाठी करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियेच्या तुलनेत लंग टीबीची शस्त्रक्रिया करणं खूप कठीण असतं.
अशा शस्त्रक्रियेसाठी तज्ज्ञ सर्जन आणि अत्याधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध असणं गरजेचं असतं. खासगी रुग्णालयात गेल्या अनेक वर्षांपासून टीबीवर थोरॅकोस्कोपिक शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. पण, त्याचा खर्च जवळपास 1 ते 5 लाखांपर्यंत जातो. पण, महापालिकेच्या टीबी रुग्णालयात ही शस्त्रक्रिया जवळपास मोफत केली जात आहे.
टीबीच्या उपचारासाठी शस्त्रक्रियेचा वापर होऊ शकतो, या गोष्टीबद्दल रुग्ण आणि डॉक्टर दोघांमध्येही जागृकता निर्माण होणं गरजेचं आहे. फुप्फुसाच्या टीबीमध्ये शस्त्रक्रिया कधी करावी लागते आणि त्याचा किती मोठा वाटा आहे याबद्दल एकूणच जागृकता नाही. ही शस्त्रक्रिया जर योग्यवेळी केली तर तो रुग्ण पूर्णपणे टीबीमुक्त होऊ शकतो.
डॉ. अमोल भानुशाली, ऑनररी थोरॅसिक सर्जन, शिवडी रुग्णालय
फुप्फुसात निर्माण झालेली पोकळी औषध घेऊनही बरी होत नसेल तर तो फुप्फुसाचा भाग काढून टाकावा लागतो.
खोकल्यातून रक्त पडत असेल तर ऑपरेशन करावं लागू शकतं.
एमडीआर टीबीमध्ये औषधं देऊनही फुप्फुसाचा खराब झालेला भाग बरा होत नसेल तर ऑपरेशनची गरज भासू शकते.
या शस्त्रक्रियेसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची गरज भासते. कारण, या शस्त्रक्रियेत एक फुप्फुस सुरू ठेवून दुसऱ्या फुप्फुसाला अॅनेस्थेशिया दिला जातो. मग शस्त्रक्रिया केली जाते. ही शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची असते. त्यामुळे अनुभवी तज्ज्ञांचीच गरज असते. टीबीमुळे रक्तवाहिन्या, फुप्फुस आणि ह्र्दय यांना धोका निर्माण होणार नाही, याची देखील काळजी घ्यावी लागते.
टीबीच्या रुग्णावर करण्यात येणाऱ्या थोरॅसिक शस्त्रक्रियेमध्ये अॅनेस्थेशिया ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण यामध्ये एकाच फुफ्फुसाला अॅनेस्थेशिया दिला जातो. या तंत्रामध्ये जास्त तज्ज्ञ निर्माण करण्याची गरज आहे.
डॉ. श्रीकृष्णा जोशी, थोरॅसिक अॅनेस्थेशिया तज्ज्ञ
हेही वाचा