आपण शरीराने सदृढ असलो की जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात कमावून खाऊ शकतो. पण, शरीरातील एक जरी अवयव निकामी झाला तर जगणंच कठीण होऊन जातं. असाच वेदनादायी प्रसंग नवी मुंबईतील कळंबोलीत राहणाऱ्या ऋषी कुरणे (३५) (नाव बदलले) यांच्याबाबत घडला. एका यंत्रात हाताचा अंगठा गमावलेल्या ऋषी यांच्यावर नुकतीच अंगठा पुनर्रोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर त्यांना जुनी नोकरीही मिळाली आहे.
खासगी कारखान्यात कामाला असणाऱ्या ऋषी यांच्या उजव्या हाताचा अंगठा एका यंत्रात अडकून तुटला. एका बाजूला त्यांच्या अंगठ्यावर उपचार सुरू असताना एका हाताने काम करणं त्यांना कठीण झालं होतं. त्यामुळं त्यांच्यावर नोकरी गमावण्याची वेळ आली.
एका बाजूला नोकरी गेली, तर दुसऱ्या बाजूला हाताची जखमी देखील भरून निघत नव्हती. अशा स्थितीत ऋषी यांनी नवी मुंबईतील खासगी रुग्णालयातील कॉस्मेटिक सर्जन डॉ. विनोद विज यांचा सल्ला घेतला. डॉ. विज यांनी हाताच्या अंगठ्याच्या जागी पायाच्या अंगठ्याचे प्रत्यारोपण करण्याचा सल्ला त्यांना दिला. शस्त्रक्रियेनंतर आपल्याला कामावर पुन्हा रुजू होता येईल, या आशेनं ऋषी यांनी हा सल्ला मान्य केला.
त्यानुसार त्यांच्यावर अंगठा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया यशस्वी देखील झाली. काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर त्यांनी पुन्हा उजव्या हाताने सर्व दैनंदिन कामे करण्यास सुरूवात केली. या हाताने त्यांना पूर्वीप्रमाणे काम करता येऊ लागल्यानं कंपनीनं त्यांना पुन्हा नोकरीत सामावून घेतलं. ऋषी या हाताने जेवण करण्यापासून वस्तू पकडण्यापर्यंत सर्वकाही व्यवस्थितपणे करतात.
सुरुवातीला जेव्हा हा रुग्ण आमच्याकडे आला, तेव्हा आम्ही त्याच्या पोटावरील थोडी त्वचा काढून ती अंगठ्यावर लावली. त्याच्या हाताच्या अंगठ्याला या दुर्घटनेत गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे हा अंगठा काढूनच टाकावा लागला. त्यातुलनेत त्याच व्यक्तीच्या पायाचा अंगठा लावणे सोपे होते. हाताच्या अंगठ्याच्या जागी पायाच्या अंगठ्याचे प्रत्यारोपण करणे, ही अत्यंत दुर्मिळ शस्त्रक्रिया आहे. मी अशी शस्त्रक्रिया सहाव्यांदा केली आहे.
- डॉ. विनोद विज, कॉस्मेटिक सर्जन
या शस्त्रक्रियेला जवळपास ६ तासांचा कालावधी लागतो. ही खूप गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असते. या शस्त्रक्रियेत कधीकधी तुमच्या पायाचा अंगठा गमवावा लागतो. त्यामुळे मोजकेच जण ही शस्त्रक्रिया करण्यासाठी तयार होतात.
माझ्यासाठी अंगठ्याशिवाय जगणं कठीण होतं. मी डाव्या हाताने जेवत होतो आणि इतर क्रिया करणं मला शक्य होत नव्हतं. आता या अंगठ्यामध्ये पूर्ण बळ येण्याची वाट मी पाहतोय.
- ऋषी कुरणे, रुग्ण
हे देखील वाचा -
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)