सुशील सावंत यांना अनेक वर्षांपूर्वी उच्च रक्तदाबाचा त्रास झाला. त्यावर निदानही करण्यात आलं. पण, त्यानंतर मात्र त्यांनी आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष केलं आणि ते कधी डॉक्टरांकडे गेलेच नाहीत. हळूहळू त्यांची प्रकृती बिघडली. अचानक त्यांच्या नाकातून रक्त वाहू लागलं आणि त्यांचा रक्तदाब २४०/१४० वर गेल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं.
नाकातून होणाऱ्या रक्तस्त्रावामुळे कवटीमध्ये रक्तस्त्राव होण्याची शक्यता टाळण्यासाठी त्यांना तातडीने आयसीयूमध्ये दाखल केलं गेलं. त्यांच्या पल्मनरी एडेमा आणि कोरोनरी अँजिओग्राफी तसंच रीनल अँजिओग्राफी या चाचण्या करण्यात आल्या. यावेळी हृदयाच्या डाव्या धमणीमध्ये अडथळा असल्याचं त्यातून दिसून आलं. त्यांच्यावर तात्काळ अँजिओप्लास्टी करण्यात आली आणि स्टेंट टाकण्यात आला.
कोणत्याही प्रकारच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, हे अशा केसेसमधून स्पष्ट होतं. अगदी छोटी डोकेदुखीदेखील गंभीर असू शकते. त्यावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यावश्यक आहे. त्यामुळे तुम्हाला वेळेत उपचार मिळतील आणि व्हॅस्क्युलर गुंतागुंत टाळता येईल. या प्रकरणात अत्यंत छोट्या परंतु कायमस्वरुपी रक्तदाबाच्या प्रकरणात डॉक्टरांकडे न जाण्याने परिस्थिती गंभीर झाली.
डॉ. झाकिया खान, फोर्टिस रुग्णालय
कल्याणच्या फोर्टिस हॉस्पिटलमधील कार्डिअॅक टीमने वेळेत केलेल्या उपचारांमुळे अत्यंत जीवघेण्या परिस्थितीतून या रुग्णाचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.