कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. पण कोरोना लसींचा तुटवडा असल्यानं सध्या सर्वांसाठी लस उपलब्ध नाही. या पार्श्वभूमीवर भारतात केवळ एकच डोस पुरेसा असणाऱ्या जॉन्सन अँड जॉन्सन कोरोना लसीचे उत्पादन करण्यासंदर्भात चाचपणी सुरू आहे.
अलीकडेच अमेरिकेत जॉन्सन अँड जॉन्सन कोरोना लसीच्या वापराला मंजुरी मिळाली आहे. भारतात या लसीचे उत्पादन करण्याचे प्रयत्न अमेरिकेकडून सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती अमेरिकेचे गृहसचिन डॅनियल स्मिथ यांनी दिली. भारतातील लस उत्पादक आणि अमेरिकी कंपन्या यांच्यामार्फत संयुक्तपणे या लसीचे उत्पादन करता येणे शक्य आहे का? याबाबत चाचपणी सुरू करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
तज्ज्ञांकडून भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. जॉन्सन अँड जॉन्सन कोरोना लसीचे उत्पादन भारतात सुरू झाल्यास भारताला आणखी एक लस उपलब्ध होऊ शकेल, असं सांगितलं जात आहे.
भारतातील लस उत्पादनात अमेरिकेतील डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे. जॉन्सन अँड जॉन्सन कोरोना लसीच्या उत्पादनासाठी या कॉर्पोरेशनच्या माध्यमातून गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. भारतातील खासगी क्षेत्रामधील कंपन्यांशी बोलणी सुरू असल्यामुळे लसीचे उत्पादन वेगानं करता येणं शक्य होऊ शकेल. यामुळे सन २०२२ च्या अखेरपर्यंत भारतात १०० कोटी लसींच्या डोसचे उत्पादन होऊ शकेल, असा विश्वास स्मिथ यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
दरम्यान कच्च्या मालाची यादी भारत सरकारनं दिली आहे. या मालाचा आणि इतर साधनांचा पुरवठा तातडीने करण्यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे. पण, जागतिक स्तरावरच कच्च्या मालाची पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. त्यामुळे कच्चा माल भारताला पुरवणं सोपं नाही.