Advertisement

नवी मुंबईत दिव्यांगांचं रांग न लावता होणार लसीकरण

महापालिकेस प्राप्त झालेल्या लसींचे दैनंदिन नियोजनाकडं बारकाईने लक्ष दिलं जात आहे. महापालिका क्षेत्रातील सर्व विभागातील नागरिकांना आपल्या नजीकच्या केंद्रावर लसीकरण उपलब्ध होईल याची काळजी घेतली जात आहे.

नवी मुंबईत दिव्यांगांचं रांग न लावता होणार लसीकरण
SHARES

कोरोनाच्या (corornavirus) संभाव्य तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी आवश्यक पूर्वतयारी नवी मुंबई महापालिकेकडून (Navi Mumbai Municipal Corporation) केली जात आहे. ३१ जुलैपर्यंत ४५ वर्षावरील सर्व नागरिकांना कोरोना लसीचा ( corona vaccine) किमान पहिला डोस दिला जावा हे लक्ष्य महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी  ठेवलं आहे. त्यादृष्टीने पालिकेकडून नियोजन करण्यात येत आहे.

सध्या लसीचा पुरवठा कमी आहे. महापालिकेने लस खरेदीसाठी जागतिक निविदा काढली आहे. त्याबाबतचा पाठपुरावा पालिकेकडून सातत्याने सुरु आहे. हे करताना महापालिकेस प्राप्त झालेल्या लसींचे दैनंदिन नियोजनाकडं बारकाईने लक्ष दिलं जात आहे. महापालिका क्षेत्रातील सर्व विभागातील नागरिकांना आपल्या नजीकच्या केंद्रावर लसीकरण उपलब्ध होईल याची काळजी घेतली जात आहे.

यामध्ये शारीरिक अडचणींमुळे लसीकरण केंद्रावर जाऊन टोकन क्रमांकासाठी रांग लावणे शक्य नसलेल्या दिव्यांगांच्या अडचणींचा विचार पालिकेने केला आहे. पालिकेच्या कोणत्याही लसीकरण केंद्रावर दिव्यांगांना (disabled people) रांग न लावता थेट लसीकरण करण्याबाबतचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. यामुळे ४५ वर्षावरील दिव्यांग व्यक्तींना विनात्रास सुलभपणे लसीकरण करून घेणं शक्य होणार आहे.

नवी मुंबई पालिका क्षेत्रात आतापर्यंत २ लाख ७० हजार २८८ नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. यामधील ९५ हजार ३९४ नागरिकांनी लसीचा दुसरा डोसही घेतला आहे. अशाप्रकारे एकूण ३ लाख ६५  हजार लसींचे डोस देण्यात आलेले आहेत.

लसीकरणामध्ये नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याकडे पालिकेकडून काळजीपूर्वक लक्ष देण्यात येत आहे. उद्या होणाऱ्या लसीकऱणाची संपूर्ण माहिती दररोज संध्याकाळी सोशल मिडीयाव्दारे प्रसारित करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे लसीकरण केंद्रांवरही उन्हाळी / पावसाळी शेड, खुर्च्या, पंखे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

पालिकेने दर दिवशी २५ हजार नागरिकांचं लसीकरण करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. यासाठी लसीकरण केंद्र (vaccination centres) वाढविण्यात येणार आहेत. लसीकरणाचं लक्ष्य गाठण्यासाठी पालिका सर्व १११ प्रभागांमध्ये लसीकरण केंद्रे उभारणार आहे. पालिकेच्या शाळांमध्ये ही केंद्र उभारण्याचं नियोजन पालिकेने केलं आहे. पालिकेच्या ५५ शाळा असून लवकरच या ठिकाणी केंद्र उभारण्यात येणार आहेत. 



हेही वाचा -

नवी मुंबई पालिका १११ प्रभागांत लसीकरण केंद्रे उभारणार

वृक्ष छाटणीची परवानगी अॅपवरून मिळणार, महापालिकेचा मोठा निर्णय


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा