मिरा रोड (mira road) येथील काशीमिरा परिसरात असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या उघड्या टाकीत पडून एका ४ वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
आसिफा अन्सारी असं या मुलीचं नाव आहे. आसिफा नीलकमल नाका इथं सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास दिवाळीतील फटाक्यांची आतिषबाजी बघायला घरातून गेली होती. ही आतिषबाजी संपल्यानंतर तिच्या सोबतचे मित्र-मैत्रिणी घरी परतले परंतु आसिफा घरी आलीच नाही.
त्यानंतर तिच्या वडीलांनी शोधाशोध करून झाल्यावर काशीमिरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत काही मुलं ही शाैचालयानजीकच्या मोकळ्या मैदानात फटाके उडवायला जमल्याचं त्यांना कळालं. परिसरात शोधाशोध केल्यावर आसिफाचा मृतदेह पोलिसांना उघड्या टाकीत आढळून आला. त्यानंतर अग्निशमन दलाला बोलावून आसिफाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
आसिफाच्या वडीलांनी याबाबत शौचालयाची टाकी उघडीच ठेवणाऱ्या मिरा-भाईंदर महापालिकेला जबाबदार ठरवलं आहे. काही दिवसांपूर्वीच या शौचालयाचं बांधकाम करण्यात आल्याची माहिती स्थानिकांनी दिली. शौचालयानजीकच्या मैदानावर लहान मुलं खेळत असल्याने टाकी सिमेंटने बंद करून घ्यावी, अशा सूचना स्थानिकांकडून काॅन्ट्रॅक्टरला देण्यात आल्या होत्या. तरीही काॅन्ट्रॅक्टरने ही टाकी उघडीच ठेवली.
आसिफाच्या मृत्यूला जबाबदार असलेला काॅन्ट्रॅक्टर आणि महापालिका अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी आसिफाच्या कुटुंबियांनी केली आहे. या दुर्घटनेबाबत काॅन्ट्रॅक्टरची चौकशी करण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
याआधी देखील शौचालयाच्या टाकीत, मॅनहोलमध्ये पडून अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. मिरा-भाईंदर परिसरात १४ हजार मॅनहोल आहेत. तर काही ठिकाणी टाकीवरील झाकणं देखील चोरून नेली जातात. याप्रकरणी पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच दोघांना अटक केली आहे.
(4 year old girl dies after falling into open sewage tank at kashimira mira road)